सांगली : रस्त्यावर छेड काढल्याने संतप्त झालेल्या एका तरुणीने टवाळखोराला रस्त्यावरच बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली करण्याचा प्रकार सोमवारी दुपारी मिरजेतील वर्दळीच्या लक्ष्मी मार्केट परिसरात घडला. यातील संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अद्याप त्याच्याविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
सोमवारी दुपारी संबंधित तरुणी मिरज माकेट परिसरात खरेदीसाठी आली होती. यावेळी खाद्य पदार्थ विक्री करणार्या गाड्यावरील एका टवाळखोर तरुणाने तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला. यामुळे संतप्त झालेल्या तरुणीने तिथेच त्याची धुलाई केली. एवढ्यावरच न थांबता त्या तरुणाच्या शर्टाला धरून फरपटत जवळच असलेल्या पोलीस ठाण्यात नेले.
हेही वाचा – फडणवीस म्हणाले, “भुजबळांनी आक्षेप सांगावे ”
हेही वाचा – सांगली : बड्यांना माफी, शेतकऱ्यांवर जप्ती; स्वाभिमानीची जिल्हा बॅंकेसमोर बोंबाबोंब
याबाबत संबंधित तरुणीने कोणतीही अद्याप तक्रार दाखल केलेली नसली तरी संशयित तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शहरात मात्र ही वार्ता वार्यासारखी पसरली. संबंधित तरुणी टवाळखोर तरुणाला पोलीस ठाण्यात फरफटत नेत असताना दुकानातील एका सीसीटीव्हीमध्ये हे दृष्य चित्रित झाले आहे.