चाकूर येथील युवतीस घरातून पळवून नेऊन इचलकरंजी येथे दोन लाख रुपयांना तिची विक्री करून अनोळखी व्यक्तीसोबत बळजबरीने तिचा विवाह लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला. या युवतीने मोठय़ा शिताफीने आपली सुटका करवून घेतली. या प्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
अठरा वर्षांच्या या युवतीस गेल्या १२ मार्चला तिच्या घराजवळ राहणाऱ्या जयश्री पाटोळे नावाच्या महिलेने कपडे खरेदीचा बहाणा करून बाजारात नेले. या महिलेने लातूर रस्ता येथे तिची आई विद्या शिवाजी अर्जुने हिच्याकडे युवतीला नेले. तेथे इतर तिघे उपस्थित होते. युवतीला प्यावयास पाणी देण्यात आले. मात्र, पाणी पिल्यानंतर चक्कर येऊन तिची शुद्ध हरपली. त्यानंतर पुढे काय झाले, हे युवतीस माहीत नाही. शुद्धीवर आली तेव्हा पंढरपूरला आल्याचे तिला कळले. तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केल्यानंतर प्रवासी तिला सोडवण्याचा प्रयत्न करीत होते, मात्र ही आमची मुलगी आहे. तिला वेड लागले आहे. उपचारासाठी घेऊन जात असल्याचे प्रवाशांना सांगण्यात आले. रेल्वेतील स्वच्छतागृहात तिला डांबून ठेवण्यात आले.
दुसऱ्या दिवशी, १३ मार्चला इचलकरंजी येथील पंडित वारके यांच्या शेतातील घरात या युवतीला ठेवले. तिच्यासोबत जयश्री पाटोळे ही महिला होतीच. मिरज तालुक्यातील सावळवाडी येथील िपटू नावाचा शिक्षक तेथे आला. तेथे युवतीचा दोन लाखांत सौदा केला. विद्याबाई व पंडित यांनी युवतीला सावळवाडी येथे नेऊन गुणधर वांजोळे याच्याशी जबरदस्तीने विवाह लावला व त्याच्या घरात डांबून ठेवले. गेल्या ९ एप्रिलला ही युवती घरात रडत बसली असता तेथे एक मुलगा आला. त्याच्याजवळ असलेला मोबाइल घेऊन तिने आपल्या वडिलांशी संपर्क साधला. त्याप्रमाणे वडील व चुलते सावळवाडी येथे आले. मात्र, त्यांना धमकी देऊन परत पाठवण्यात आले. युवतीच्या वडिलांनी यानंतर चाकूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस हवालदार मोहन वळसे, सुभाष गीते, शौकत शेख यांनी सावळवाडीत जाऊन अपहरण झालेल्या युवतीची सुटका केली. युवतीने दिलेल्या तक्रारीवरून जयश्री पाटोळे, विद्या अर्जुने, पंडित वारके, मास्तर िपटू, गुणधर वांजोळे यांच्यासह इतर तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा