उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात होते. तिथे त्यांनी बालेवाडी येथील कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांना केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमन यांच्या बारामती दौऱ्याबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं वक्तव्य चांगलंच चर्चेत आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन पुन्हा एकदा बारामती दौर्‍यावर येणार असल्याच्या बातम्यांबद्दल पत्रकारांनी विचारले असता, देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बारामतीवर तुमचं फार लक्ष असतं त्यामुळे इथल्या केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी तुम्हाला दिसतात. पण अन्यही लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री येतात, दोन दिवस थांबतात आणि तेथील तयारीचा आढावा घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधतात. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तुमचं बारामतीवर फार लक्ष असतं असं जे वक्तव्य त्यांनी केलं ते विशेष चर्चेत आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होण्याची शक्यता नाही

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होण्याची कुठलीही शक्यता नाही, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रात्री पुण्यात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वात लोकसभा निवडणुका आम्ही संपूर्ण ताकदीने जिंकू आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागून त्याही जिंकू. या दोन्ही निवडणुका एकत्र होण्याची कुठलीही शक्यता नाही.

मविआच्या वज्रमुठीला आधीच तडे गेले आहेत

“महाविकास आघाडीच्या वज्रमुठीला आधीच तडे गेले आहेत. कुणी कुठे बसायचं? कुणी कुठे उभं रहायचं?, कुणी आधी बोलायचं? या संदर्भातले वाद चालले आहेत. वज्रमुठीचा जो प्रयोग आहे त्यातल्या नेत्यांबद्दल शरद पवार यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलेलंच आहे. आम्ही वेगळं सांगण्याची आवश्यकताच नाही. तेव्हा तर आम्ही विरोधातच होतो. मला असं वाटतं की शरद पवार यांनीच हे सगळं स्पष्ट केलं आहे तर आम्ही बोलायची आवश्यकता काय?” असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

Story img Loader