‘कुठलीही वस्तू घरबसल्या विका’, अशी जाहिरात असलेले ‘ओलेक्स डॉट कॉम’ हे संकेतस्थळ प्रचंड लोकप्रिय आहे. घरबसल्या वस्तूंची खरेदीविक्री त्यावरून केली जाते. पण या संकेतस्थळावरून आपला मोबाईल विकण्याचा प्रयत्न एका तरुणाला भलताच महागात पडला. जाहिरात पाहून मोबाईल विकत घेण्यासाठी आलेल्या तिघांनी या तरुणाला मारहाण करून त्याचा मोबाईल घेऊन पळ काढला.
संदीप जाधव (२०) हा तरुण चांदिवलीच्या संघर्ष नगर येथे रहातो. एका स्वयंसेवी संस्थेत तो काम करतो. त्याला आपला सॅमसंग ग्रँड हा मोबाईल विकायचा होता. त्याने ‘ओलेक्स डॉट कॉम’वर मोबाईलचे छायाचित्र टाकून तो विकायचा आहे, अशी जाहिरात दिली होती. ती जाहिरात पाहून एका इसमाने संदीपशी संपर्क साधला. १२ हजार रुपये ही किंमतही ठरली. पण चांदिवली येथे येणे शक्य नसल्याने चेंबूर रेल्वेस्थानकाजवळील स्कायवॉकच्या खाली भेटायचे ठरले. रात्री १० वाजता भेट ठरली. संदीप आपला मित्र दीपक दुबे (१९) याला घेऊन स्कायवॉकच्या खाली गेला. तिथे मोबाईल विकत घेण्यासाठी तीनजण आले होते. त्यांनी संदीप आणि दीपकला मारहाण करीत मोबाईल घेऊन पळून गेले. दीपकला त्यांनी दगडाने मारहाण केली. त्याच्यावर राजावाडी रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. टिळकनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण भालेराव यांनी दिली.

Story img Loader