Jitendra Awhad Rohit Pawar on Latur Crime : लातूरमध्ये मंगळवारी सायंकाळी एक संतापजनक घटना घडली. शहरातील अंबाजोगाई रस्त्यावर एका तरुणाला पाच-सहा जणांनी बेदम मारहाण केली आणि ते दुचाकीवर बसून पळून गेले. गुंडांची ही टोळी तरुणाला नग्न करून मारहाण करत होती आणि १००-१५० लोक हा प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहत होते. मात्र, बघ्यांच्या गर्दीतील कोणीही त्या गुंडांना अडवलं नाही. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर चार तासांनी पोलिसांनी या गुंडांच्या टोळीतील चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या. तसेच या प्रवृत्तीला आळा बसावा यासाठी या गुंडांची रस्त्यावरून वरात काढत त्यांना पोलीस ठाण्यात नेलं. मात्र या मारहाणीचा व्हिडीओ पाहून लोकांमध्ये संतापाची लाट उसलळली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड व आमदार रोहित पवार यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट करून त्यांचा संताप व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांमध्ये गुन्हेगारी घटनांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. गुंडांच्या टोळ्यांनी सामान्य नागरिकांना अमानुषपणे मारहाण केल्याच्या व हत्येच्या अनेक घटना अलीकडे पाहायला मिळाल्या आहेत. या घटनांचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. यापैकी बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे थेट विधीमंडळापर्यंत पडसाद उमटले. अशा घटनांमुळे राज्याच्या गृहमंत्रालयावर सातत्याने टीका होत आहे. त्यातच आता लातूरमधील घटनेमुळे पुन्हा एकदा गृह विभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ लागलं आहे.

“महाराष्ट्रात नेमकं काय चाललंय?” जितेंद्र आव्हाडांचा प्रश्न

लातूरमधील मारहाणीचा व्हिडीओ जितेंद्र आव्हाड यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की “हा व्हिडिओ पाहिला आणि तळपायाची आग मस्तकात गेली. कोणताही माणूस असू द्या, क्षणात विचार करेल की अरे महाराष्ट्रात नेमकं काय चाललंय. आवरा यांना, अन्यथा एखाद्या दिवशी हे लोक थेट यंत्रणेलाच आव्हान देतील. सावध व्हा आणि कारवाई करा. अशा घटनांमध्ये केवळ नावाला (दिखावा म्हणून) कारवाई करू नका. ही प्रकरणं न्यायालयात गेल्यानंतर पीडितांची बाजू व सरकारची बाजू मांडण्यासाठी चांगले सरकारी वकील नेमा.

रोहित पवारांचा संताप

दरम्यान, रोहित पवार यांनी हा व्हिडीओ पाहून म्हटलं आहे की “भर रस्त्यात निपचित उघडी-नागडी पडलेली महाराष्ट्राची कायदा व सुव्यवस्था मंत्रालयातील कोटवाल्यांना दिसेल का? आणि राज्यातील गुन्हेगारीच्या भस्मासुराचा वध होऊन सामान्य माणसाचं जगणं निर्भय होईल का? पोलिसांनी गुन्हेगारांची धिंड काढली, तेवढाच दिलासा.”

Story img Loader