नागरिकांनी पोलिसांना डांबले; उत्तरीय तपासणी अहवालानंतर गुन्हे दाखल होणार
यवतमाळ : उमरखेड तालुक्यातील बोरी(वन) येथील यात्रेतील जुगारावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी मारहाण केल्याने गावातील एका तरुणाचा मृत्यू झाला. संजय विठ्ठल बुरकुले (३५) असे मृताचे नाव आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली.
बोरी (वन) गावाशेजारी महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरली होती. यात्रेत जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून दराटी पोलीस ठाण्याचे जमादार युवराज जाधव, शिपाई साबळे आणि होमगार्डचा एक जवान असे तिघे जण सोमवारी सायंकाळी बोरी (वन) गावात गेले. पोलीस दिसताच जुगाऱ्यांनी पळ काढला. या पळापळीत रस्त्यालगत शौचास बसलेला संजय बुरकुले यानेही धूम ठोकली. त्याचवेळी पोलिसांनी त्याला अडवून एक, दोन दंडुके मारल्याचे सांगितले जाते. यात खाली कोसळून तो जागीच ठार झाला. ही वार्ता गावात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांना पोलीस पाटलाच्या घरी एका खोलीत डांबून ठेवले. होमगार्ड तेथून पसार झाला. गावकऱ्यांनी ही माहिती उमरखेड पोलीस ठाण्यात कळवली. संजयचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप करीत नागरिकांनी पोलिसांवर गुन्हे दाखल होईपर्यंत मृतदेह हलवण्यास नकार दिला. उत्तरीय तपासणीचा अहवाल आल्यानंतर दोषींवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याचे आश्वासन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर नागरिकांनी नरमाईची भूमिका घेतली. त्यानंतर डांबून ठेवलेल्या पोलिसांचीही सुटका करण्यात आली.
आज तीन डॉक्टरांच्या चमूने मृतदेहाची ‘इन कॅमेरा’ उत्तरीय तापसणी केली.