अहिल्यानगरःअल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याच्या आरोपावरून विशेष न्यायालयाने आरोपी अजय उर्फ विनायक राजेंद्र गर्जे (२०, खडांबे खुर्द, राहुरी, अहिल्यानगर) यास २० वर्षे सक्तमजुरी व विविध कलमान्वये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष सरकारी वकील मनीषा केळगंद्रे- शिंदे यांनी ही माहिती दिली.

या खटल्याचा निकाल विशेष जिल्हा न्यायाधीश माधुरी मोरे यांनी दिला. सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील मनीषा केळगंद्रे यांनी युक्तिवाद केला. खटल्यात एकूण १० साक्षीदार तपासण्यात आले. घटना घडली, १७ डिसेंबर २०२२ रोजी, त्यावेळेस पिडीत मुलगी १२ वर्षे २ महिने वयाची होती.

खटल्याची माहिती अशी, आरोपी अजय उर्फ विनायक गर्जे याने त्याचा साथीदार गणेश राजेंद्र चव्हाण याच्या मदतीने पीडित मुलीला चेंडूफळ (ता.  वैजापूर, छत्रपती संभाजीनगर) येथे पळवून नेले. तेथे तिच्यावर अजय गर्जे याने अत्याचार केले. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राहुरी पोलिसांनी सुरुवातीला अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पीडित मुलीचा शोध घेऊन तीला आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर पीडित मुलीचा पोलिसांनी जबाब नोंदवला. त्यानुसार आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे यांनी केला व न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. युक्तिवाद करताना सरकारी वकील मनीषा केळगंद्रे यांनी सांगितले की, घटना घडली त्यावेळेस पीडित मुलगी १२ वर्षे २ महिन्यांची होती. कमी वयामुळे तिच्या बालमनावर वाईट परिणाम होणार आहेत. त्याचे ओरखडे आयुष्यभर तिच्या मनावर पडतील.

आरोपीला निर्दोष सोडले तर समाजातील वाईट प्रवृत्ती वाढीस लागून पुन्हा अशा घटना घडण्याची शक्यता नाकरता येणार नाही. त्यामुळे आरोपीत जास्तीत जास्त शिक्षा करावी. खटल्यात सरकारी वकील मनीषा केळगंद्रे यांना पैरवी अधिकारी योगेश वाघ व इफ्तेकार सय्यद यांनी सहाय्य केले.