अहिल्यानगरः शहरालगतच्या एमआयडीसी परिसरातील दोन टोळ्यातील पूर्ववैमनस्यातून एका युवकाचे अपहरण करुन खून करण्यात आला. या खुनाच्या आरोपावरून एकूण ९ जणांना अटक करण्यात आली आहे. यातील पाच जण सध्या पोलीस कोठडीत आहेत तर आज, रविवारी आणखी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी ही माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या सुमारे वर्षभरापासून एमआयडीसी परिसरात दोन टोळ्यात वैयमनष्य सुरू आहे. त्यातून एकाची अर्धनग्न अवस्थेत धिंड काढण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या टोळीतील तरुणावर हल्ला करण्यात आला. हे दोन्ही गुन्हे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल आहेत. त्यानंतर आता युवकाचे अपहरण करून खून करण्यात आला.

वैभव शिवाजी नायकोडी (१९, तपोवन रस्ता, अहिल्यानगर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तो २२ फेब्रुवारीच्या रात्री बेपत्ता झाल्याची तक्रार त्याची आई सीमा शिवाजी नायकोडी यांनी तोफखाना पोलिसांकडे तीन दिवसानंतर, दि. २५ फेब्रुवारीला दिली. त्यानंतर आणखी दोन दिवसानंतर सीमा नायकोडी यांनी त्यांच्या मुलाला लपका नावाचा मुलगा व आणखी ३ अनोळखींनी कारमध्ये बळजबरीने बसवून पळून नेल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला.

या संदर्भात तोफखाना पोलिसांनी अनिकेत उर्फ लपक्या शिवाजी सोमवंशी, सुमित बाळासाहेब थोरात, महेश मारोतराव पाटील, नितीन अशोक ननावरे या चौघांना ताब्यात घेतले. न्यायालयाने या चौघांना पोलिस कोठडी सुनावली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एमआयडीसी परिसरात शोध घेऊन सीसीटीव्ही फुटेजच्या विश्लेषणाद्वारे आणखी ५ जणांना अटक केली. विशाल दीपक कापरे, विकास अशोक गव्हाणे, करण सुंदर शिंदे, रोहित बापूसाहेब गोसावी व स्वप्निल रमाकांत पाटील या पाच जणांना अटक केली.

मागील भांडणांच्या कारणावरून वैभव नायकोडी यास तपोवन रस्त्यावरून बळजबरीने कारमध्ये बसून एमआयडीसी परिसरातील मोकळ्या जागेत व नंतर एका अपार्टमेंटमध्ये नेऊन मारहाण करून ठार मारण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी वैभव नायकोडी याचा मृतदेह कारमधून विळद घाट परिसरातील केकताई भागात नेण्यात आला. तेथे त्याचा मृत्यूदेह लाकूड व डिझेलचा वापर करून पेटवून देऊन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने हाडे व राखेची विल्हेवाट लावण्यात आली. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिस निरीक्षक आहेर यांनी दिली. स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेल्या पाच जणांना पुढील तपासासाठी तोफखाना पोलिसांकडे सुपूर्त करण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक कोकरे करत आहेत.