अहिल्यानगर : केडगाव उपनगरातील रेणुकामाता मंदिराजवळ कौटुंबिक वादातून तरुणाचा खून करण्यात आला. या संदर्भात कोतवाली पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विपुल छोट्या काळे (वय ३५, केडगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

त्याची आई शास्त्री काळे हिने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी सुरेश जाटला काळे, संदीप ढोल्या चव्हाण, कुणाल सुरेश काळे ( तिघे रा. केडगाव), चईन फायर काळे, दारूचंद फादर चव्हाण व सुंदर नितीन काळे (रा. शेंडी, अहिल्यानगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी विपुल काळे व त्याचा नातेवाईक असलेले संशयित आरोपी यांच्यामध्ये बहिणीला नांदवण्याच्या कारणावरून वाद झाला. काल, गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास विपुल काळे भाजी आणण्यासाठी बाहेर गेला असता रेणुकामाता मंदिराजवळ त्याच्यावर सहा जणांनी लाकडी दांडके, दगड व लाथाबुक्क्यांनी हल्ला चढवत मारहाण केली. त्यानंतर संशयित आरोपी तेथून पसार झाले. याबाबत शास्त्री काळे यांना माहिती मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता विपुल रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्धावस्थेत आढळला. त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याचे निधन झाल्याचे जाहीर केले.