सोलापूर : अवघ्या तरूणाईच्या उत्साही जल्लोषात रंग पंचमीचा सोलापुरात उत्सव साजरा झाला. शहरी आणि ग्रामीण भागात रंगांची मुक्त उधळण करताना यंदा पाण्याचा अपव्यव टाळून सुक्या रंगांचा वापर करण्यात आला. यंदा लोकसभा निवडणुकीत रंग पंचमी साजरी होत असताना त्यात प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवारही रंग खेळून आनंद लुटला.
हेही वाचा >>> सातारा: महाराजांच्या आर्शिवादाने मला दहा हत्तीचे बळ- शिवेंद्रसिंहराजे
काल सायंकाळपासूनच रंग पंचमीला सुरूवात झाली. शालेय विद्यार्थ्यांनी शाळा सुटल्यानंतर एकमेकांवर रंगांची उधळण केली. रंग पंचमीदिनी सकाळी रंग खेळण्याची मजा बालसवंगड्यांनीच लुटली. नंतर त्यात अवघी तरूणाई उतरली. महाविद्यालयीन वर्गमित्रांसह गल्ली-चाळीतील मित्रांनी एकत्र येऊन रंगांची उधळण केली. गावठाण भागात रंग पंचमी साजरी करताना रंग उडविण्याबरोबरच हलग्यांच्या विशिष्ट तालावर अंत्ययात्रेचे सोंग करून नागरिकांचे लक्ष वेधण्यात आले. काही ठिकाणी एकमेकांचे कपडे फाडण्यापर्यंत उनाडगिरीचे दर्शन पाहावयास मिळाले. मित्रांच्या झुंडी दुचाकी उडवत घरोघरी जाऊन रंग लावत होत्या.
हेही वाचा >>> सातारा: ‘काशीनाथाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात बावधनच्या भैरवनाथाच्या बगाड मिरवणूक
सदर बाजार भागातील लोधी गल्लीतून लोधी समाजाच्यावतीने रंग गाड्यांची मिरवणूक काढण्यात आली. यात ५० पेक्षा अधिक बैलगाड्यांचा सहभाग होता. प्रत्येक बैलगाडीत रंगांचे पिंप ठेवून रस्त्यावर नागरिकांवर मोठ्या आकाराच्या पिचका-यांनी रंगांची मनसोक्त उधळण केली जात होती.
रंग पंचमीच्याउत्सवाचा आनंद लुटताना महिला आणि तरूणींचा सहभाग तेवढाच लक्षवेधी होता. लोधी, राजपूत, लमाण, चित्तोड राजपूत लोहार आदी समाजाचा रंग पंचमीतील उत्साह उल्लेखनीय होता. यंदा बाजारात वाढत्या महागाईप्रमाणे रंगांचे दर २५ ते ३० टक्क्यांनी वाढले होते. विविध आकर्षक पिचकारी, साखरे हार, पुष्पहार आदी साहित्य महागले होते.