Yugendra Pawar On Assembly Election Result : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आला आहे.ज्यामध्ये महायुतीला मोठा विजय मिळाला तर दुसरीकडे महाविकास आघाडीला मात्र दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर महायुतीच्या अनेक नेत्यांकडून निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेतले जात आहेत. यामध्ये काँग्रेसचे नेते नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड आणि इतर काही नेत्यांचा समावेश आहे. यादरम्यान पराभूत उमेदवारांकडून मत पडताळणीसाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज दाखल केले जात आहेत.
यादरम्यान पुणे जिल्ह्यातील ११ उमेदवारांनी मत पडताळणीचा अर्ज दाखल केला आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवारांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते युगेंद्र पवार यांनीदेखील मत पडताळणीसाठी अर्ज केला आहे.
याबद्दल बोलताना युगेंद्र पवार म्हणाले की, “जिल्ह्यातून अकरा अर्ज मतपडताळणीसाठी दिले आहेत. फक्त माझाच पराभव झाला असता तर मी तो केला देखील नसता. बारामतीत कोणी उभं राहायला पण तयार होत नाही. आम्ही तिथं उभे राहिलो, विचारांना आणि पवारांना (शरद पवार) सोडलं नाही. बारामतीच्या स्वाभिमानी जनतेसाठी उभा राहिलो. पण आमच्या पुढची ताकद पण मोठी होती. पण असा निकाल फक्त माझ्यासाठी लागला असता तर ठीक आहे. पण अख्खा महाराष्ट्रात संशय आणि संभ्रमाचे वातावरण आहे. मोठे-मोठे दिग्गज नेते जे त्यांच्या मतदारसंघात अनेक दशकांपासून निवडून येत आहेत, त्यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे आम्हाला वाटतं की काहीतरी असण्याची शक्यता आहे”.
मत पडताळणी करण्याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले की, “सुप्रीम कोर्टाने हा अधिकार आम्हाला दिला आहे. पाच टक्के ईव्हीएम तुम्ही तपासू शकता. जर अधिकार असेल आणि संशयाचे वातावरण असेल तर तपासणी करायला काय हरकत आहे?”
त्यांना काहीतरी वेगळं झालेलं दिसत असेल तर…
दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेबाबत संशय निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांनी आत्मक्लेश आंदोलन सुरू केले होते. यानंतर महाविकास आघाडी आणि महायुतीतील नेत्यांनी त्यांची भेट घेतली होती. याबद्दल युगेंद्र पवार म्हणाले की, “शेवटी ते (बाबा आढाव) खूप वरिष्ठ आहेत, ९५ वर्ष त्यांचं वय आहे. त्यांनी अनेक निवडणुका पाहील्या आहेत. महाराष्ट्राच्या स्थापनेपासून ते निवडणुका पाहात आले आहेत. त्यांना काहीतरी वेगळं झालेलं दिसत असेल तर ते आपल्याला गांभिर्याने घ्यावे लागेल”.
हेही वाचा>> “काहीही झालं तरी म्हाताऱ्याला…”, आबांच्या आईनं नातू रोहित पाटीलला शरद पवारांबद्दल काय सल्ला दिला?
युगेंद्र पवारांचा १ लाखांच्या फरकाने पराभव
विधानसभा निवडणुकीत बारामती विधानसभा मतदारसंघाकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते. येथे अजित पवार विरूद्ध युगेंद्र पवार असा सामना पाहायला मिळाला. ज्यामध्ये युगेंद्र पवार यांच्यासाठी शरद पवारांसह त्यांच्या पत्नीही प्रचारात उतरल्या होत्या. पण २३ नोव्हेंबरला जाहीर झालेल्या निकालात बारामतीचा गड अजित पवारांनी अभेद्य ठेवला आहे. त्यांना १ लाख ८१ हजार १३२ मते मिळाली असून युगेंद्र पवारांना ८० हजार २३३ मते मिळाली. म्हणजेच तब्बल १ लाखांच्या फरकाने युगेंद्र पवारांचा पराभव झाला.