Yugendra Pawar On Raj and Uddhav Thackeray : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेनेच्या (ठाकरे) युतीची चर्चा ऐकायला मिळत आहे. राज्य सरकारने प्राथमिक मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना हिंदी भाषा शिकणं अनिवार्य केलं आहे. त्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कडाडून विरोध केला आहे. पाठोपाठ उद्धव ठाकरे यांनी देखील राज्य सरकारच्या धोरणाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. “मराठी माणसांच्या अस्तित्त्वासाठी आमच्यातील वाद, भांडणं किरकोळ आहेत”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं. तर, उद्धव ठाकरे म्हणाले, “मी देखील किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार आहे”. त्यामुळे मनसे आणि शिवसेना (ठाकरे) एकत्र येणार का? याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चां रंगू लागल्या आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने राज ठाकरे व उद्धव ठाकरेंमधील होऊ घातलेल्या कथित युतीचं स्वागत केलं आहे. खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांच्यानंतर युगेंद्र पवार यांनी देखील अशी युती पाहताना आनंद वाटेल असं वक्तव्य केलं आहे.
युगेंद्र पवार म्हणाले, “आमचं पवार कुटुंब एकत्र आहे. एक कुटुंब म्हणून आम्ही एकत्रच आहोत. आम्ही कधी वेगळे झालो आहोत असं वाटत नाही. व्यक्तींचे राजकीय विचार बदलू शकतात. तसेच, काही वेळा परिस्थिती तसे निर्णय घ्यायला भाग पाडते. परंतु, कुटुंब म्हणून तुम्ही कोणाला तोडू शकत नाही. शेवटी ते रक्ताचं नातं असतं.”
मुंबई जिंकण्याचा दोन्ही ठाकरेंचा प्रयत्न?
दरम्यान, दोन्ही ठाकरेंच्या मनोमिलनामुळे महायुतीत अस्वस्थता असल्याचं बोललं जात आहे. त्यावर युगेंद्र पवारांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, “तो महायुतीचा प्रश्न आहे. तसेच दोन्ही ठाकरेंच्या मनोमिलनाची केवळ चर्चा आहे. मात्र, ते दोघे (राज व उद्धव) एकत्र आल्यावर काय होईल ते पाहायला मलाही आवडेल. परंतु, तो दोन मोठ्या नेत्यांचा, त्यांच्या कुटुंबांचा व पक्षांचा अंतर्गत प्रश्न आहे. मुंबई जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न असू शकतो. मात्र, मी त्यावर काही बोलू शकत नाही.”
कुटुंबात शरद पवार व अजित पवारांचा निर्णय अंतिम : युगेंद्र पवार
यावेळी युगेंद्र पवारांना त्यांच्या पवार कुटुंबाबद्दल प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, “पवार कुटुंब एकत्रच आहे. बाकी मोठे निर्णय हे शरद पवार किंवा अजित पवार घेतील. आम्ही लहान मुलं त्यावर बोलू शकत नाही. वरिष्ठांनी घेतलेले निर्णय सर्वांना स्वीकारावे लागतात. शरद पवार व अजित पवार जे निर्णय घेतात ते सर्वांना शंभर टक्के मान्य असतात.