मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आजित पवार हे भारतीय जनता पार्टीच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील एकूण ४० आमदार नाराज असून त्यांचा अजित पवारांना पाठिंबा आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी महाराष्ट्रात महाभूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या सर्व पार्श्वभूमीवर युवासेनेचे नेते (उद्धव ठाकरे गट) वरुण सरदेसाई यांनी भाष्य केलं आहे. जोपर्यंत जनता आमच्याबरोबर आहे, तोपर्यंत आम्हाला चिंता करण्याची काहीही गरज नाही, असं विधान वरुण सरदेसाई यांनी केलं आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

हेही वाचा- राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाबरोबर जाणार का? शरद पवारांनी दिलं तीन शब्दात उत्तर, म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेसचे ४० आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. अजित पवार भाजपात जातील का? असा प्रश्न विचारला असता वरुण सरदेसाई म्हणाले, “राजकारणात जर तर च्या प्रश्नांना काहीही अर्थ नसतो. आज सकाळी अजित पवार प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, या गोष्टींमध्ये काहीही तथ्य नाही. त्यामुळे ‘जर-तर’वर भाष्य करण्यापेक्षा आम्ही आमच्या पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवर लक्ष देत आहोत. दोन दिवसांपूर्वी नागपूरला महाविकास आघाडीची जबरदस्त सभा झाली. त्यालादेखील खूप चांगला प्रतिसाद मिळाला. येत्या काळात मुंबई आणि पुण्यातही महाविकास आघाडीची सभा होणार आहे. त्यामुळे जनता आमच्याबरोबर असेल तर आम्हाला चिंता करायची गरज नाही.”

हेही वाचा- राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार? शिंदे गटाच्या खासदार भावना गवळींचं मोठं विधान; म्हणाल्या, “काही दिवसांत आम्ही…

“सध्या महाराष्ट्रात सत्तासंघर्षाचं दुसरं सत्र सुरू झालंय” या संजय राऊतांच्या विधानाबाबत विचारलं असता वरुण सरदेसाई म्हणाले, “आमच्याबरोबर जे झालं ते संपूर्ण देशानं पाहिलं आहे. ईडी, सीबीआय आणि आयटीच्या धाकाने पक्ष कसा फोडता येतो? सरकार कसं पाडता येतं? हेही संपूर्ण देशानं पाहिलं आहे. त्यामुळे आता जे काही होतंय त्यावर आमचे नेते संजय राऊत यांनी भाष्य केलं असेल, ते मोठे नेते आहेत, ते महाविकास आघाडीचे नेते आहेत, त्यांना जास्त माहिती असेल.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yuva sena leader varun sardesai on rumour about ajit pawar joing bjp rmm
Show comments