“इमानदारीचा जमाना राहिला नाही..”, हे वाक्य आपण सतत ऐकत असतो. कारण या वाक्याला साजेशा घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात. पण काही घटना अशाही असतात, ज्यांच्यामुळे माणुसकी अजूनही जिवंत आहे, याचा प्रत्यय येत राहतो. अशीच घटना वाशिम जिल्ह्यात घडली आहे. वाशिम शहरातील एका कांदे विक्रेत्याने त्याला सापडलेले आठ लाखाचे सोने आणि काही रोख रक्कम परत केली आहे. ३० जानेवारी रोजी एरंडा या गावातील रमेश घुगे हे वाशिम शहरात सामान खरेदी करीता वाशिम शहरात आले होते. त्यावेळी त्यांची पिशवी हरवली. आपली जमापुंजी आता गेली, या दुःखात असताना शेख जाहेद या कांदे विक्रेत्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हसू उमलले.
अशी इमानदारी सर्वांनी दाखवावी – पोलीस
रमेश घुगे यांची पिशवी गहाळ झाल्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलीस सदर प्रकरणाचा शोध घेत असतानाच त्यांना शेख मुस्तफा यांचा फोन आला. मुस्तफा यांचे सहकारी आणि वाशिम शहरातील कांदे विक्रेते शेख जाहेद यांना पिशवी मिळाल्याचे मुस्तफा यांनी सांगितले. पोलिसांनी तात्काळ मुस्तफा यांचे घर गाठले आणि ही तिच पिशवी आहे का? याची खात्री केली. तेव्हा ती रमेश घुगे यांचीच हरवलेली पिशवी असल्याचे समजले. पोलिसांनी जाहेद शेक यांचे कौतुक करताना सांगितले की, अशी इमानदारी सर्वांनीच दाखवली तर इतरांच्या आयुष्यातील दुःख आपल्याला दूर करता येईल.
यावेळी शेख जाहेदने सांगितले की, “रमेश घुगे माझ्या दुकानासमोर बसले होते. ते गेल्यानंतर त्यांची पिशवी तिथेच सुटल्याचे मी पाहिले. मी लगेच पिशवी ताब्यात घेतली. त्यावेळी त्यात सोने आणि रोकड असल्याचे माझ्या लक्षात आले. तसेच बँकेचे पासबुकही होते. पासबुकवर फोन नंबर नसल्यामुळे मला त्यांना फोन करता आला नाही. मग मी मुस्तफा शेख यांना संपर्क साधला आणि सदर प्रकार सांगितला. मुस्तफा यांनीच पोलिसांशी समन्वय साधून रमेश घुगे यांना पिशवी मिळवून देण्यासाठी मदत केली. घुगे यांना त्यांचा मुद्देमाल परत मिळाल्याबद्दल मला आनंद वाटतो.”
रमेश घुगेंच्या डोळ्यात आनंदाश्रू
पिशवी मिळाल्यानंतर रमेश घुगे यांनी आनंद व्यक्त केला. मी बाजारातून कांदे आणि लसून घेत असताना सोने, रोकड असलेली बॅक चुकून पडली होती. इतर सामानाच्या पिशव्यांमुळे मला त्याक्षणी ते समजले नाही. पण नंतर लक्षात आल्यानंतर मी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. शेख जाहेद यांनी पिशवी परत मिळवून दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया घुगे यांनी दिली. धुळे शहरामध्ये शेख जाहेद यांच्या या कृतीचे कौतुक होत आहे.