Zakir Hussain passes away : सुप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन यांचं निधन झालं आहे. वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे त्यांची पत्नी आणि दोन मुली असं कुटुंब आहे. झाकीर हुसैन यांना सॅन फ्रॅन्सिस्को येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचार चालू होते, तसंच त्यांची प्रकृती गंभीर आहे असंही कळत होतं. मात्र उपचारांदरम्यान झाकीर हुसैन यांची प्राणज्योत मालवली. गेल्या अनेक वर्षांपासून झाकीर हुसैन यांचं वास्तव्य अमेरिकेतच होतं. झाकीर हुसैन आणि तबला हे समीकरण म्हणजे दिवा आणि ज्योतीसारखं होतं. वडील अल्लाह रखा खान यांच्याकडूनच त्यांनी तबलावादनाचे धडे गिरवले होते. या अत्यंत विनम्र कलावंताचं निधन झालं आहे. झाकीर हुसैन यांच्या निधनानंतर जगभरातील त्यांच्या चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समाजमाध्यमांवर एक खास पोस्ट लिहून उस्तादजींना श्रद्धांजली वाहिली आहे.

राज ठाकरे यांनी म्हटलं आहे की “जगप्रसिद्द तबला वादक, पद्मविभूषण, उस्ताद झाकीर हुसैन यांचं दुःखद निधन झालं. निसर्गातील प्रत्येक गोष्ट एका लयीत सुरु असते, मग तो श्वास असू दे की वाहणारा वारा असू दे की फुलणारी फुलं असू देत, या प्रत्येकातील लय अगदी मोजक्या लोकांना जाणवते, अनुभवता येते, आणि अशी माणसं अतिशय लयबद्ध असतात, तालबद्ध असतात, आणि ती त्यांच्या क्षेत्रातील योगी पुरुष ठरतात. उस्ताद झाकीर हुसैन हे तबल्यातील ‘तालयोगी’ होते असं मला नेहमी वाटत राहिलं. असं म्हणतात झाकीर हुसैन यांचे वडील अल्लाह रखा खान साहेबांनी, झाकीरजींच्या जन्मानंतर लगेचच त्यांच्या कानात हळूच तबल्याचे बोल सांगितले. असलं जबरदस्त बाळकडू किती जणांच्या वाट्याला येतं मला माहित नाही, आणि जरी आलं तरी ते पेलवावं झाकीरजींनीच”.

हे ही वाचा >> Zakir Hussain Passes Away : सुप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन यांचं निधन, ‘वाह उस्ताद वाह’ म्हणत तबल्यावर लिलया पडणारी थाप शांत!

अन् झाकीर हुसैन यांनी जगाला भारतीय संगीताची ‘शक्ती’ दाखवली

मनसे अध्यक्षांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की “वयाच्या १२ व्या वर्षापासूनच ते वडिलांबरोबर मैफिलीत साथीला बसू लागले. तो काळ असा होता की पंडित रविशंकर यांच्यामुळे भारतीय वाद्यसंगीताबद्दल जागतिक पातळीवर प्रचंड आकर्षण निर्माण झालं होतं आणि जगभरातील नामांकित वादक, भारतीय वाद्यसंगीताच्यासोबत विविध प्रयोग करायला उत्सुक होतं. एका अर्थाने भारतीय संगीत जागतिकरणाच्या युगात शिरत होतं, अशा वेळेला झाकीर हुसैन यांनी ‘शक्ती’ बँडची स्थापना केली आणि भारतीय संगीताची शक्ती जगाला अधिकच जाणवू लागली.

हे ही वाचा >> Zakir Hussain : झाकीर हुसैन यांच्या निधनामुळे तबला पोरका, जागतिक किर्ती मिळवणाऱ्या कलावंताबाबत या गोष्टी माहीत आहेत का?

राज ठाकरे म्हणाले, “प्रत्येक वाद्य त्या वादकाला काहीतरी सांगत असतं आणि ते ऐकू येणं, त्याला वादकाने प्रतिसाद देणं ही क्रिया निरंतर सुरु असते. अशी निरंतर पण खूप खोल प्रक्रिया उस्तादजी आणि तबल्यात जवळपास ७३ वर्ष सुरु होती. जी आज थांबली. उस्तादजी जरी अनंतात विलीन झाले तरी त्यांचा तबल्यावरचा ताल अनंत काळापर्यंत ऐकू येईल. उस्ताद झाकीर हुसैन यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली.