मुंबईच्या राजकीय वर्तुळात मोठे प्रस्थ असलेले माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांनी लोकसभा निवडणूक तोंडावर असताना काँग्रेसचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला. त्यांचे पुत्र झिशान सिद्दीकी मात्र अद्याप काँग्रेसमध्येच आहेत. माझा काँग्रेस सोडण्याचा विचार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले होते. असे असताना काँग्रेसने झिशान सिद्दीकी यांची मुबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी केली आहे. यावरच झिशान सिद्दीकी यांनी प्रतिक्रिया दिली. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“न सांगताच मला पदावरून हटवण्यात आले”

“काँग्रेसने घेतलेल्या या निर्णयाची मला कोणतीही कल्पना नव्हती. हा निर्णय घेतल्यानंतर मला आश्चर्य वाटले. मी अजमेर शरीफवरून आलो आहे. मला काल या निर्णयाबाबत माहिती देण्यात आली. मला कोणताही मेल, किंवा मेसेज मिळालेला नाही. मी १२ वर्ष काँग्रेस पक्षासाठी दिलेले आहेत. मला पदावरून हटवायचेच होते तर त्यांनी मला थेट संपर्क करायला हवा होता. मात्र त्यांनी आता निर्णय घेतलेला आहे. मला समाजमाध्यमांमार्फत समजलेले आहे,” असे झिशान सिद्दीकी म्हणाले.

“मला ९० हजार लोकांनी मतदान केले होते”

“मी आता माझ्या जवळच्या लोकांशी याबाबत बोलणार आहे. उद्या किंवा परवा मी याबाबत पत्रकार परिषद घेणार आहे. माझ्यावर काय अन्याय झालेले आहेत, नेमकं काय घडलेलं आहे ते मी या पत्रकार परिषदेत सांगणार आहे. मला पदावरून का हटवण्यात आले याची मला कोणतीही कल्पना नाही. मला साधारण ९० हजार लोकांनी मतदान केले होते. त्यानंतरच मला मुंबईच्या युवक काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. मला या ९० हजार लोकांना आता उत्तर द्यावे लागेल,” असा इशारा सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्षाला दिला.

“आता मी सर्वकाही सांगणार”

“अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यात एकाच कुटुंबातील लोक वेगवेगळ्या पक्षाशी जोडलेले असतात. मी तर काँग्रेस पक्ष सोडण्याचा कधी विचार केला नाही. मी काँग्रेस पक्ष सोडणार असल्याची त्यांना शंका असेल तर त्यांनी माझ्याशी याबाबत चर्चा करायला हवी होती. त्यांनी मला विचारायला हवे होते. मी काँग्रेस पक्षाच्या बैठकांना हजेरी लावली. त्यानंतर अनेकांनी माझे कौतुक केले. मात्र आता माझ्यासोबत जे झाले आहे, ते मी सांगणार आहे,” असे झिशान सिद्दीकी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zeeshan siddique comment on congress decision on removing him from mumbai youth president prd