Zeeshan Siddique : बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आणि काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी ( Zeeshan Siddique ) हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. झिशान सिद्दीकी हे बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीसांना भेटायला आले आहेत. पोलिसांनी बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात झिशान सिद्दीकी ( Zeeshan Siddique ) यांचाही जबाब नोंदवला. आता झिशान सिद्दीकी देवेंद्र फडणवीस यांच्याशी काय चर्चा करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. झिशान सिद्दीकी ( Zeeshan Siddique ) आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काय चर्चा होते ? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

झिशान सिद्दीकी सागर बंगल्यावर

झिशान सिद्दीकी हे काही वेळापूर्वीच सागर बंगल्यावर पोहचले आहेत. त्याआधी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर हेदेखील सागर बंगल्यावर पोहचले आहेत. बाबा सिद्दीकी यांची हत्या १२ ऑक्टोबरच्या रात्री झाली. त्यानंतर बाबा सिद्दीकी यांना जेव्हा रुग्णालयात आणण्यात आलं होतं तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने लिलावती रुग्णालयात धाव घेतली होती. या प्रकरणात आत्तापर्यंत तीन आरोपींना अटक केली आहे. यानंतर आता झिशान सिद्दीकी ( Zeeshan Siddique ) यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी सागर बंगला गाठला आहे. ज्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे.

हे पण वाचा- बाबा सिद्दीकी यांच्यासह झिशान सिद्दीकीही होते रडारवर, हल्लेखोरांचा नेमका कट काय होता?

झिशान सिद्दीकी पक्ष सोडणार?

लोकसभा निवडणुकीच्या आधी बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश केला होता. आता झिशान सिद्दीकी ( Zeeshan Siddique ) निवडणुकीच्या तोंडावर काही वेगळा निर्णय घेतात का? या चर्चांनाही उधाण आलं आहे. झिशान सिद्दीकी यांचे काँग्रेस पक्षातच मतभेद आहेत. खास करुन सचिन सावंत आणि त्यांचं पटत नाही त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आधी वेगळा निर्णय घेऊन काँग्रेसला धक्का देणार का? याचीही चर्चा आता रंगली आहे.

झिशान सिद्दीकींची पोस्ट काय?

झिशान सिद्दीकी ( Zeeshan Siddique ) यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर गुरुवारी एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “माझ्या वडिलांनी गरीब निष्पाप लोकांचं जीवन सुधारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या घरांचं व त्यांचं संरक्षण करताना आपला जीव गमावला. माझं कुटुंब आज मोडून पडलंय. परंतु, माझ्या वडिलांच्या मृत्यूचं राजकारण केलं जाऊ नये आणि त्यांचा संघर्ष व्यर्थ जाऊ नये असं मला वाटतं. मला न्याय हवा आहे, माझ्या कुटुंबाला न्याय हवा आहे”.

झिशान सिद्दीकींची ही पोस्ट आणि लगेच आज फडणवीसांची भेट

गुरुवारी झिशान सिद्दीकींनी ही पोस्ट करणं आणि आज त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना सागर बंगल्यावर जाऊन भेटणं या दोन्ही गोष्टी जोडून याकडे पाहिलं जातं आहे.  दरम्यान बाबा सिद्दीकी यांच्या मारेकऱ्यांकडून पोलिसांनी तीन पिस्तुलं जप्त केली आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियन बनावटीचं एक ग्लॉक पिस्तूल, टर्किश पिस्तूल आणि एक देशी बनावटीचं पिस्तूल असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.