जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत परस्परविरोधी दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना समान प्रत्येकी २९ मते पडल्याने दोन्ही पदांची निवड चिठ्ठी काढून करण्यात आली. त्यात आघाडीचे विजयसिंह पंडित यांची अध्यक्षपदी तर काँग्रेसच्या एकमेव सदस्या आशा संजय दौंड यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावलेल्या या निवडणुकीत आघाडीला नशिबाने विजय मिळाला.
बीड जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी रविवारी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्या उपस्थितीत दुपारी निवडणूक झाली. राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून स्वाभिमानी संघटनेचे विजयसिंह पंडित तर भाजपकडून दत्ता जाधव यांनी अध्यक्षपदासाठी आणि उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या आशा दौंड तर भाजपचे दशरथ वनवे यांनी उमेदवारी दाखल केली. सभागृहात दोन्ही पदासाठी मतदान घेण्यात आले. तेव्हा समान प्रत्येकी २९ मते पडली. परिणामी जिल्हाधिकारी यांनी अध्यक्षपदासाठी सुरुवातीला दोन्ही नावाच्या चिठ्ठय़ा डब्यात टाकल्या. समृद्धी तांदळे या मुलीने काढलेल्या चिठ्ठीत विजयसिंह पंडित यांची चिठ्ठी तर उपाध्यक्षपदासाठी विश्वंभर तिडके या मुलाने काढलेल्या चिठ्ठीत काँग्रेसच्या आशा दौंड यांचे नाव निघाल्याने  दोन्ही पदे आघाडीकडे गेली.
राष्ट्रवादीचे रमेश आडसकर यांनी भाजपात प्रवेश केल्याने भाजप सेना युतीचे संख्याबळ २३ वरून २९ झाले होते. त्यामुळे आमदार पंकजा मुंडे यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. तर निवडणुकीच्या तोंडावर सत्ता जाऊ नये यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ताकद पणाला लावली होती.
गेवराईचे माजी मंत्री शिवाजीराव पंडित जिल्हा परिषदेत अध्यक्ष झाले होते. त्यानंतर प्रदीर्घ काळाने त्यांचा तिसरा मुलगा विजयसिंह यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली.
काँग्रेस-मनसे समझोता कायम
जि. प. अध्यक्षपदी श्रीराम महाजन
प्रतिनिधी, औरंगाबाद
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आठ सदस्यांच्या मदतीने जिल्हा परिषदेत काँग्रेसचे श्रीराम महाजन यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. आमदार अब्दुल सत्तार यांनी अध्यक्षपद सिल्लोड तालुक्याकडे असावे, यासाठी विशेष प्रयत्न केले. उपाध्यक्षपदाची माळ राष्ट्रवादीचे दिनकर पवार यांच्या गळयात पडली. महाजन यांना ३४ मते पडली.
जिल्हा परिषदेतील अध्यक्ष-उपाध्यक्ष पदांची निवडणूक चुरशीची होईल असे मानले जात होते. विशेषत: मनसेचे सदस्य नक्की कोणती भूमिका घेतात याकडेही अनेकांचे लक्ष होते. ६० सदस्य असलेल्या जिल्हा परिषदेत अध्यक्ष महाजन यांना ३४ तर शिवसेनेचे प्रतिस्पर्धी उमेदवार अनिल चोरडिया यांना २५ मते मिळाली. सोयगाव तालुक्यातील फर्दापूर गटाच्या सदस्या भिकाबाई तडवी गैरहजर राहिल्या. मनसेच्या एकजुटीमुळे भाजप-सेनेच्या नेत्यांना प्रयत्न करूनही हाती फारसे काही लागले नसल्याचे निकालामुळे स्पष्ट झाले आहे. मनसेच्या ५ सदस्यांना बरोबर घेऊ न जिल्हा परिषदेत सत्तांतर करण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यामुळे दोन्ही बाजूने सदस्यांची सहल घडवून आणली होती. दुपारी आघाडी व युतीचे सदस्य बसने जिल्हा परिषदेत आले. पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी काम पाहिले. महाजन हे भराडी गटाचे सदस्य आहेत.  उपाध्यक्षपदासाठी पवार यांच्या विरोधात रामदास पालोदकर व इंदुबाई वाघ यांनी अर्ज दाखल केले होते. पालोदकरांनी अर्ज मागे घेतला. उपाध्यक्षपदाच्या निवडीतही अध्यक्षपदासारखीच मते पडली.
वरपूडकर गटाला मोठा हादरा
परभणीत जि. प. अध्यक्षपदी राजेश विटेकर
वार्ताहर, परभणी
परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे राजेश विटेकर व उपाध्यक्षपदी राजेंद्र लहाने यांची बिनविरोध निवड झाली. शिवसेना तटस्थ राहिल्याने माजी राज्यमंत्री सुरेश वरपूडकर, आ. रामप्रसाद बोर्डीकर यांच्या मनसुब्यावर पाणी फिरले असून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विजय भांबळे व आ.बाबाजानी दुर्राणी गटाची सरशी झाली आहे.
जिल्हा परिषदेमध्ये दोन अपक्षांच्या सहकार्याने राष्ट्रवादीचे बहुमत असताना यावेळी राष्ट्रवादी अंतर्गत गटबाजीमुळे आ. बाबाजानी दुर्राणी व जिल्हाध्यक्ष विजय भांबळे यांना आपल्या गटाच्या सदस्यास अध्यक्षपदावर बसविण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. लोकसभा निवडणुकीनंतर या जिल्ह्यात पक्षीय राजकारण बाजूला पडून राष्ट्रवादीचे सुरेश वरपूडकर, काँग्रेसचे आ. रामप्रसाद बोर्डीकर, शिवसेनेचे खा. संजय जाधव, अपक्ष आ. सीताराम घनदाट यांच्यात गट्टी होऊन नवीन राजकीय समीकरण तयार झाले होते. या समीकरणाच्या आधारे वरपूडकर यांनी राष्ट्रवादीत फूट पाडून आपले चिरंजीव समशेर यांना अध्यक्षपदावर बसविण्याचा चंग बांधला होता. परंतु त्यांना शेवटपर्यंत सदस्यांची जुळवाजुळव करण्यात यश आले नाही. काँग्रेसचे ८ पकी ३ सदस्य भांबळे-बाबाजानी गटाला मिळाले. त्यामुळे भांबळे-बाबाजानी यांचे जिल्हा परिषदेत वर्चस्व वाढून कालपर्यंत त्यांच्याकडे समर्थक सदस्यांची संख्या २६ पर्यंत होती. शिवसेनेने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली नसती तर शिवसेनेत फुट पडून ४ सदस्य राष्ट्रवादीच्या बाजूने मतदान करणार होते. परंतु शनिवारी सायंकाळी तटस्थ राहण्याचा निर्णय शिवसेनेने घेतल्याचे जाहीर केले. त्यामुळे वरपूडकर व बोर्डीकर यांच्या बदलत्या सत्ताकारणातील हवा निघून गेली. राजेश विटेकर अध्यक्षपदी विराजमान होणार हे रात्रीच स्पष्ट झाले होते. आपला इरादा तडीस जात नाही हे ओळखून वरपूडकरांनी शिवसेनेला अध्यक्षपद देण्याबाबतही व्यूहरचना आखली होती. पण तीही यशस्वी ठरली नाही.
आजच्या बठकीला शिवसेनेचे ११ पकी २ सदस्य उपस्थित होते. तर काँगेसच्या गटनेत्या मेघना बोर्डीकरसह त्यांच्या पक्षाचे सर्व सदस्य सभागृहात हजर होते. समशेर वरपूडकर यांच्यासह  त्यांच्या गटातील सात सदस्यही उपस्थित राहिले तर घनदाट मित्र मंडळाचे तीन सदस्य अनुपस्थित राहिले. अध्यक्ष व उपाध्यक्षासाठी एकमेव अर्ज आल्याने निवडीची औपचारिकता दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास पूर्ण झाली.
राष्ट्रवादीच्या विरोधात काँग्रेस महायुतीचा एकोपा
अध्यक्षपदी धीरज पाटील, उपाध्यक्षपदी सुधाकर गुंड
वार्ताहर, उस्मानाबाद
उस्मानाबाद जिल्हा परिषदेत काँग्रेस, शिवसेना आणि भाजपाने एकत्रित येत पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब पाटील यांचे चिरंजीव धीरज पाटील यांची, तर उपाध्यक्षपदी सुधाकर गुंड यांची बहुमताने निवड झाली. ऐन विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेस आणि महायुतीचा एकोपा राष्ट्रवादी काँग्रेससाठी पुन्हा धोक्याची घंटा ठरणार आहे.
उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचा कार्यकाळ रविवारी पूर्ण झाला. त्यानुसार अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात निवडणूक प्रक्रिया पार पडली. विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीकडे जिल्ह्यातील मतदारांचे लक्ष लागले होते. अडीच वर्षांच्या पहिल्या टप्प्यात शिवसेना, भाजपा आणि काँग्रेसने सत्तेसाठी नवा उस्मानाबाद पॅटर्न तयार केला होता. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी असताना उस्मानाबादमध्ये मात्र या आघाडीला पुन्हा एकदा सुरुंग लागला आहे. काँग्रेसला शिवसेना आणि भाजपाच्या सदस्यांनी बिनशर्त पाठिंबा दिल्यामुळे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँगेस एकटी पडली आहे.
अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे धीरज पाटील आणि मधुकर मोटे, तर उपाध्यक्षपदासाठी सुधाकर गुंड आणि सरस्वती पाटील यांच्यात सरळ लढत झाली. अपेक्षेप्रमाणे काँग्रेसचे धीरज पाटील यांना काँग्रेसचे २०, शिवसेनेचे १३ व भाजपाचे २, अशी ३५ मते पडली, तर मधुकर मोटे यांना राष्ट्रवादी काँग्रेसची १९ मते मिळाली. उपाध्यक्षपदाचे उमेदवार गुंड यांनाही ३५ तर सरस्वती पाटील यांच्या पारडय़ात केवळ १९ मते पडली. हात उंचावून सदस्यांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला. निवडणूक प्रक्रिया सुरू असताना जिल्हा परिषद सदस्यांनी एकमेकांना हात उंचावण्याचा इशारा केल्यामुळे पीठासीन अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी मतदारांना प्रभावित करणाऱ्या सदस्यांवर कारवाई करणार असल्याचे संकेत दिले. त्यानंतर सभागृहात शांतता पसरली. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून डॉ. प्रशांत नारनवरे यांनी तर सहपीठासीन अधिकारी म्हणून शिल्पा करमरकर यांनी काम पाहिले.
राष्ट्रवादीसाठी गर्भीत इशारा
विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्या पाश्र्वभूमीवर जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची ही निवडणूक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला एकाकी पाडत शिवसेना, भाजपा आणि काँग्रेसने केलेली आघाडी विधानसभा निवडणुकीतही कायम राहिल्यास राष्ट्रवादी काँग्रेसला २००९ प्रमाणे यंदाही संकटाला सामोरे जावे लागेल, असे मानले जाते.
जालना जि. प. अध्यक्ष व उपाध्यक्षपद युतीकडे
वार्ताहर, जालना
जालना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपाचे तुकाराम जाधव निवडून आले, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अनिरुद्ध खोतकर यांची निवड झाली. जाधव व खोतकर यांना प्रत्येकी ३४ मते, तर त्यांचे प्रतिस्पर्धी पंकज बोराडे व संजय काळबांडे यांना १५ मते पडली. ५५ सदस्यांपैकी सहा सदस्य अनुपस्थित होते.
पक्षीय बलाबल पाहता शिवसेना-भाजप युतीचा पराभव निश्चित होता. गेली अडीच वर्षे अध्यक्षपद शिवसेनेच्या आशाताई भुतेकर तर उपाध्यक्षपद भाजपचे राहुल लोणीकर यांच्याकडे होते. राहुल लोणीकर हे भाजपाचे जिल्हाध्यक्ष बबनराव लोणीकर यांचे पुत्र असून अध्यक्षपदासाठी ते दावेदार समजले जात होते. भाजपचे भगवानसिंग तोडावत यांचे नावही चर्चेत होते. परंतु अध्यक्षपदी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे निकटवर्तीय तुकाराम जाधव यांची निवड झाली. उपाध्यक्षपदी निवडून आलेले अनिरुद्ध खोतकर यापूर्वी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदावर राहिलेले आहेत. लोकनिर्वाचित जालना जिल्हा परिषद आल्यापासून सलग पाच वेळेस ते जिल्हा परिषद सदस्यपदी निवडून आलेले आहेत.
फोटो-२१लक्ष्मीबाई
िहगोली जि.प. अध्यक्षपदी शिवसेनेच्या लक्ष्मीबाई यशवंते
वार्ताहर, िहगोली
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या लक्ष्मीबाई यशवंते यांनी विजय मिळविला. त्यांना २८ मते पडली, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीच्या शारदा नाईक यांना २१ मते मिळाली. उपाध्यक्षपदी राजेश्वर पतंगे निवडून आले. मतदारादरम्यान काँग्रेसच्या अश्विनी यंबल गरहजर होत्या. जिल्हाधिकारी तथा पीठासन अधिकारी तुकाराम कासार यांनी काम पाहिले.
निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर माजी आ. गजाननराव घुगे म्हणाले, शिवसेनेच्या एकजुटीचा हा विजय आहे. तर नवनिर्वाचित अध्यक्षा लक्ष्मीबाई यशवंते यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी गटातटाचे राजकारण करणार नाही, असे सांगितले.
जि. प. अध्यक्षपदी मंगलाताई गुंडले, उपाध्यक्षपदी दिलीप धोंडगे
वार्ताहर, नांदेड
नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे काँग्रेसच्या मंगलाताई गुंडले यांची तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिलीप धोंडगे यांची वर्णी लागली. या दोघांनी आपापल्या प्रतिस्पध्र्याचा ४५ विरुद्ध १७ अशा मतांनी पराभव केला.
नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची मुदत आज संपली. अध्यक्ष -उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी आज जिल्हाधिकारी धीरजकुमार यांच्या उपस्थितीत झालेल्या एका विशेष सभेत काँग्रेसतर्फे मंगलाताई गुंडले तर शिवसेनेतर्फे महादेवी वाडेकर यांनी अर्ज दाखल केला. उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिलीप धोंडगे यांनी, भाजपच्या लक्ष्मण ठक्करवाड तर शिवसेनेच्या वत्सलाबाई पुयड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
आचारसंहिता लागू असल्याने आनंदाचा जल्लोष साजरा करताना काँग्रेसचे पदाधिकारी मात्र समर्थकांना सबुरीचा सल्ला देत होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव होते. या पदासाठी मंगलाताई गुंडले व सिंधुताई कमळेकर यांच्यात जोरदार चुरस होती. गुंडले यांच्यासाठी आमदार पोकर्णा यांनी तर सिंधुताई कमळेकर यांच्यासाठी आमदार वसंत चव्हाण यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. या लढाईत श्री. पोकर्णा यांची सरशी झाली.
उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांच्या समर्थकापकी एकाला संधी मिळेल, असे वाटत होते पण आमदार धोंडगे यांनी आपले वजन वापरून पुत्राला उपाध्यक्षपदी विराजमान केले.
लातूर जि. प. अध्यक्षपदी कव्हेकर, उपाध्यक्षपदी पाटील
वार्ताहर, लातूर
लातूर जि. प. च्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या प्रतिभा पाटील कव्हेकर, तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे अण्णासाहेब पाटील यांची निवड जाहीर झाली. लातूर जि. प. त काँग्रेसचे स्पष्ट बहुमत असल्यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्षपद दोन्ही काँग्रेसकडे जाणार, हे निश्चित होते.
अध्यक्षपदाच्या उमेदवार प्रतिभा पाटील कव्हेकर यांना ४१ तर त्यांच्या प्रतिस्पर्धी मधू बिरादार यांना १३ मते मिळाली. उपाध्यक्षपदी निवडून आलेले पाटील यांना ४१ मते तर त्यांच्या प्रतिस्पर्धी सविता शिंदे यांना १३ मते मिळाली. या निवडणुकीत काँग्रेसचे चार सदस्य गैरहजर राहिले. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर कव्हेकर समर्थकांनी जि.प.आवारात फटाके फोडून स्वागत केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा