दिगंबर शिंदे, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सांगली : शाळकरी वयातील मुलांची दोस्तीच न्यारी. दोस्तीसाठी काय पण करायला लावणारी ओढ वेगळीच असते. अशा ओढीतून पाचवीत शिकणाऱ्या मुलांनी खाऊसाठी दिलेला रुपया-दोन रुपये जमा केले आणि त्यातून आपल्या शाळकरी मित्रावर औषधोपचार करत मैत्रीची नवी गोष्ट रचली आहे.

तासगाव तालुक्यातील नागाव कवठय़ाच्या जिल्हा परिषद शाळेत मैत्रीची ही कहाणी घडली. शाळेतील एका गरीब घरातील मुलाच्या अंगावर पुरळ उठले होते. त्याच्या पालकाकडून औषधपाणीही करता येण्यासारखी स्थिती नव्हती. दिवसभर हा मुलगा वर्गात बसला असताना पुरळ उठलेल्या ठिकाणी खाजवत असे. त्याची अवस्था पाहून पाचवीत शिकणाऱ्या त्याच्या आठ-दहा मित्रांनी पैशाची त्याच्या औषधासाठी घरातून खाऊसाठी म्हणून पैसे आणण्याचे ठरविले. यातून काही रक्कम जमा झाली. ही सर्व रक्कम खाऊसाठी खर्च न करता मित्राच्या औषधासाठी खर्च करण्यात आली. यातून औषध दुकानातून औषधही आणून मित्राला देण्यात आले. या औषधामुळे मित्राच्या अंगावरील ९० टक्के पुरळ आणि व्रण कमी झाले आहेत. मित्रासाठी काही तरी केल्याचे अथवा उपकार केल्याची भावनाही या मित्रांमध्ये नव्हती. त्यांनी ही बाब शिक्षक अथवा पालकांनाही सांगितली नाही.

मात्र, या मित्रामध्ये असलेल्या एका मुलाचे वडिलांना तब्बल १५ दिवसांनी या घटनेची कुणकुण लागली. त्यांनी चौकशी केली असता, मित्रासाठी मित्रांनी केलेले हे कर्तव्य केवळ मैत्रीखातर होते. यात सांगण्यासारखे काहीच नाही म्हणून सांगितले नाही, अशीच प्रत्येक मुलाची भूमिका होती.

या घटनेची माहिती चर्चेतून समजताच गावातील डॉ. संदीप पाटील यांनी या मित्रसमूहाची भेट घेऊन या मुलांना खाऊसाठी प्रत्येक १०१ रुपये आणि आजारी मुलाच्या औषधासाठी एक हजार रुपये देऊन अजाणत्या वयातील मैत्रीला सलाम केला. मुलांच्या अनोख्या मैत्रीमध्ये हर्षवर्धन सूर्यवंशी, अर्णव साळुंखे, तेजस कांबळे, शिवरत्न पाटील, सनी शिरतोडे, साहील मुलाणी, हर्षवर्धन कांबळे, पार्थ रूईकर, रूद्रप्रताप सुर्यवंशी, वरद पाटील, सोहम सुतार या चिमुकल्यांचा समावेश आहे.