अनुजा बर्वे

‘नाती’ म्हणजे नक्की काय? ‘ना’कारता येऊच शकत नाहीत ‘ती’ (म्हणजे रक्ताची) की ‘ना’ ‘ना’ करता कधी जुळली जातात कळतही नाही ती? (म्हणजे प्रेम-लग्नबंधनातली) की ‘ना’कारण्यावरच आधारलेली ती? (म्हणजे सासू-सून, नणंद-भावजय इत्यादी) की ‘ना’कारावीशी न वाटणारी अन् मनापासून स्वीकारलेली मित्रत्वाची

ती? खरं तर नात्यांचे

प्रकारही अनेक अन् बदलत्या काळानुसार पैलूही!

जोशीकाकांच्या घराला कुलूप बघून मी शेजारच्या घराची बेल जरा भीतभीतच वाजवली.

‘‘आज माझी तब्येत बरी नाही म्हणून, नाही तर नेहमी दिवसभर आम्ही कोणीच घरात नसतो. मिस्टर जोशींची माहिती तुम्हाला वॉचमनकडे मिळेल, ओके?’’

शेजाऱ्यांनी ‘फॉर्मल’ उत्तर द्यायचं सौजन्य तर दाखवलं पण संभाषण थांबवण्याची सूचना त्या ‘ओके’मध्ये दडल्याच्या जाणिवेनं मला अगदी कानकोंडं झालं. नकळत माझ्या लहानपणीचे, शेजाऱ्यांच्या पाहुण्यालाही, ‘‘या आत या, बसा नं.’’ असं म्हणून अगत्याने पाणी आणून देणारे दिवस आठवले. रक्ताच्या नात्याइतकीच किंवा कधी कधी त्याहीपेक्षा गहिरी अशी ‘शेजारनाती’ मी जवळून अनुभवली आहेत. हल्ली असा शेजारधर्म, जिवाभावाची नाती विरळ होताना दिसताहेत. शेजारी ‘लक्ष’ ठेवतील हा ‘आधार’ हल्ली ‘वॉच’मनच्या खांद्यावर गेलाय हे ‘लक्षा’त आणून दिलं मला या संभाषणाने! आणि विविध नातेसंबंध किती झपाटय़ानं बदलतायत, असं प्रकर्षांनं वाटून गेलं.

मनात विचार आला ‘नाती’ म्हणजे नक्की काय? ‘ना’कारता येऊच शकत नाहीत ‘ती’ (म्हणजे रक्ताची) की ‘ना’ ‘ना’ करता कधी जुळली जातात कळतही नाही ‘ती’?(म्हणजे प्रेम-लग्नबंधनातली) की ‘ना’कारण्यावरच आधारलेली ‘ती’? (म्हणजे सासू-सून, नणंद-भावजय इत्यादी) की ‘ना’कारावीशी न वाटणारी अन् मनापासून स्वीकारलेली मित्रत्त्वाची ‘ती’?

खरं तर नात्यांचे प्रकारही अनेक अन् पैलूही!

नेहमी येणारी कचरेवाली, कामवाली यांच्याशीही नातं जुळतंच की एकप्रकारे! पूर्वी सणासुदीला प्रेमाने दिलेल्या खाऊचं-भेटीचं अप्रूप असायचं या मंडळींना. जवळ जवळ प्रत्येक सणाला ‘गोडाधोडाचं पान’ राखून ठेवण्याचा प्रघात असे. पण आताशा बघावं तर सगळा ‘रोखी’चा मामला. ठळक बदल म्हणजे इंग्रजीतून ‘हॅप्पी दसरा’, ‘हॅप्पी दिवाळी’…अशी भरभरून ‘कोरडय़ा’ शुभेच्छांची देवाणघेवाण मात्र चालते. माझ्या लहानपणी पोस्टमनजवळही थोडा संवाद होत असे पत्र घेता घेता. आताशा घाईघाईने ‘बंद लेटर बॉक्स’मध्ये पत्र टाकून निघून जाणाऱ्या पोस्टमनचे पाय दाराजवळ रेंगाळताना दिसतात ते फक्त ‘दिवाळी’साठी!

सर्वात लाडकं अन् साईसारखं मऊशार नातं म्हणजे नातवंडांचं. त्याकाळी आम्हा नातवंडांचा ‘घरगुती’ खाऊसाठी आजीभोवती गराडा असायचा. ‘पोळीचा लाडू’, ‘भोपळ्याचे घारगे’, ‘उन्हात वाळवलेल्या बटाटय़ाच्या किसाचा तळून केलेला चिवडा’ या आणि अशा घरच्या घरी बनलेल्या कैक पदार्थावर ताव मारल्यानंतर ‘चेरी ऑन द टॉप’ म्हणून आजीच्या रंगतदार गोष्टी भक्तिभावाने ऐकताना धमाल येत असे. आणि आज?

‘‘आज्जी, सगळे फूड आयटेम तुझी आज्जी घरी ‘कुक’ करायची? स्टोरीज् ऐकताना तुम्ही सगळे एकत्र झोपायचात? तुझ्या आजी-आजोबांची सेपरेट बेडरूम नव्हती?’’ माझ्या नातवाच्या अशा प्रश्नांना उत्तरं देताना आणि अविश्वास भरलेल्या नजरेला नजर देताना माझी उडणारी तारांबळ दिसू नये म्हणून सतर्क राहावं लागतं. एवढंच नाही तर आजीच्या रोलमध्ये असलेल्या मला ‘अपडेटेड’सुद्धा राहावं लागतं. डिजिटल युगातल्या या नातवंडांना ‘पटतील’ अशा गोष्टी रचून किंवा पारंपरिक गोष्टी आजच्या संदर्भानुसार बदलून सांगाव्या लागतात. रेसिपी शोज बघून अधेमधे ‘विदेशी पदार्थ’ बनवून त्यांची ‘रसनापूर्ती’ करावी लागते.

अजून एक पारंपरिक आणि जिव्हाळ्याचं नातं म्हणजे माय-लेकींचं नातं. हे नातं जसं ‘प्रेमाचं’ तसंच ‘हक्का’चंही. पूर्वी वेळप्रसंगी आईला ‘गृहीत’ धरलं जायचं आणि लेकीच्या प्रेमापोटी ‘ते’ आईला चालायचंही. आजकाल आईच्याही ‘प्रायर कमिटमेंट्स’चा विचार करावा लागतो लेकींना त्यांचा ‘हक्क’ बजावण्याआधी.

पूर्वी लेकी-सुनांचं बाळंतपण म्हणजे ‘जबाबदारी’ अन् ‘पर्वणी’ही असायची. आपल्या अनुभवांचा पुढच्या पिढीला उपयोग होण्यासारखा दुसरा आनंद नव्हता आयांसाठी. हल्ली ही जबाबदारी ‘गुगल’ आणि अन्य ‘अ‍ॅप्स’नी स्वीकारलीय. पहिल्या महिन्यापासून ते डिलिव्हरीपर्यंत सगळं तपशीलवार दिलेल्या माहितीनुसार, देशात किंवा परदेशात जाऊन आईने फक्त ‘एक्झिक्युट’ करायचं अन् त्यातच ‘बाळंतपण केल्याचा’ आनंद मानायचा.

सातेक वर्षांपूर्वीची गोष्ट! माझ्या मुलीचं लग्न ठरल्याची बातमी मी रस्त्यात भेटलेल्या माझ्या मत्रिणीला दिल्यानंतर आणि ‘‘कोणता तिकडचाच का? लव्ह मॅरेज?’ या शंकांचं रीतसर निवारण केल्यानंतर, ‘‘भाग्यवान आहेस बाई! अगं, अपोजिट जेंडर आहे हे केवढं महत्त्वाचं!’’ अशी सध्या पालकांवर असलेल्या मूलभूत दडपणाचं वर्णन करणारी बोलकी प्रतिक्रिया आली होती. आधी सुयोग्य जोडी कधी जमेल त्याची काळजी आणि नंतर ‘जोडी सदा बनी रहे’ म्हणून ताण.

असंही ‘नवरा-बायकोच्या’ नात्यांचं वर्णन करायला वर्षांनुवर्ष ‘विलक्षण’ हे एकमेव विशेषण वापरलं जातं. पूर्वी ‘शहाण्या माणसानं नवरा-बायकोच्या भांडणात पडू नये, ते दोघं केव्हा एक होतील त्याचा नेम नाही’ असं म्हटलं जायचं. हल्ली पहावं तर अगदी कालपर्यंत सगळं आलबेल आहे असं वाटत असतानाच ‘ते विभक्त झाले’ अशी बातमी येते आणि शहाण्या माणसालाही वेडं व्हायला होतं. म्हणूनच म्हटलं की ‘विलक्षण’ या विशेषणाशिवाय पर्याय नाही.

हल्ली मुलं आणि मुली ‘देशातच दूर’ किंवा ‘दूरदेशी’ राहात असल्यामुळे व्याही-व्याही आणि विहिणी-विहिणींच्या नातेसंबंधांत मात्र जवळीक वाढलेली दिसून येते. पूर्वी ‘या’ नात्यात थोडा ‘आब अन् दुरावा’ दोन्ही असायचं. त्या तुलनेत हा खरोखरच ‘सकारात्मक’ बदल आहेस वाटतं मला!

आत्या-काका, मावश्या-मामा अशा एकत्र नात्यांचा जमाना केव्हाच मागे पडला. हल्ली ‘हमारे दो’च्या प्रथेनुसार मावशी किंवा मामा, आत्या किंवा काका एवढीच नाती असतात. त्याकाळी वाढदिवस, धार्मिक कार्य, सणवार यांच्यानिमित्ताने गाठीभेटी होऊन नातेसंबंध दृढ होत. हल्ली निमित्ते तीच असली तरी ‘गाठीभेटी’ व्हर्चुअल’ असतात. ‘नीट’ संवाद साधायला ‘नेट’कृपा हवी. खरं तर ‘सख्खं नातं’ही ‘तोंडदेखलं’ (ज्यासाठी सध्या ‘फेस-टाइम’ अशी चपखल संज्ञा वापरतात) होऊन जातं अनेकदा, असं मला वाटतं.

पूर्वी उतारवयातील आई-वडिलांना आजारपणात नात्यांचा भक्कम आधार असायचा, भीती असायची ती ‘रोगनिदान, उपचार अन् अर्थभाराची’. आताशा अर्थभारापेक्षाही मुलांच्या प्रमोशन अथवा प्लेजर ट्रिपच्या आड किंवा नातवंडांच्या महत्त्वाच्या परीक्षांमध्ये तर ‘आजारपण’ उद्भवणार नाहीना, ही चिंता अधिक भेडसावते. ‘नात्यातला विश्वास’ डळमळतो तो इथे!

एक लक्षणीय बदल म्हणजे ‘नवजात’ ज्येष्ठ नागरिक (नुकतेच साठीत पदार्पण केलेले) आणि मुरलेले ज्येष्ठ नागरिक खूपशा प्रमाणात ‘नेट-साक्षर’ झालेयत. मुलाबाळांच्या अनुपस्थितीमुळे ‘गेट वेल सून’ आणि इतरही अतोनात शुभेच्छांच्या देवाण-घेवाणीतून मानसिक आधार मिळवायचा प्रयत्न करताहेत. तरुणाईप्रमाणेच थोरांचंही या सोशल-माध्यमांशी घनिष्ट नातं जुळू लागलंय!

व्हॉट्सअ‍ॅप-फेसबुक वरच्या ‘गुडी-गुडी’ नात्यात सगळेच रमताहेत, जिथे ‘ना त्यांचं’ बाईंिडग अपेक्षित आहे, ‘ना त्यांचा’ कस लागतोय. शेवटी सोसेल तेवढं ‘सोशल’माध्यमात कार्यरत राहून ‘नव्या-जुन्या’ नातेसंबंधांच्या रेशीमगाठी परत जुळून येवोत. हीच ईश्वर चरणी प्रार्थना!

neelimabarve@gmail.com

chaturang@expressindia.com