मीनाक्षी म्हात्रे

ती म्हणाली, ‘‘अगं, तुला कल्पना नाही, नोकरी करणाऱ्या मुलं, सुनांचा संसार सांभाळण्यासाठी काय तारेवरची कसरत करावी लागते ती? आपणही नोकरी केली; पण आपला संसार, मुलं यांचे प्रश्न आपणच सोडवले. आता वाढत्या वयाबरोबर त्यांचे संसार सांभाळणं डोईजड होत जातं, पण बोलायची सोय नाही.’’ मी विचारात पडले, माझा तर अनुभव किती वेगळा आहे. शिवाय आईवडिलांची पुंडलिकाप्रमाणे सेवा करणारी किती तरी मुले, मुली आहेत. म्हणजे नकारार्थी अनुभव येणाऱ्यांनी आपल्या पायाखाली काय जळतंय हेही पाहण्याची वेळ आली आहे का?

अलीकडेच सकाळी ९ वाजताचा चित्रपट पाहून साडेअकरा-बारा वाजण्याच्या सुमाराला घरी परतत होते. थिएटर घरापासून जवळ असल्याने चालत निघाले होते. थोडय़ा अंतरावर एक बाई पाठीवर स्कूलबॅग आणि हातात एक पिशवी घेऊन पाय ओढत चालत होती. तिच्याजवळून मी पुढे गेले आणि तिने मागून हाक मारत विचारले, ‘‘अगं, काय हे? पाहून न पाहिल्यासारखे करतेस की काय?’’

मागे वळून पाहिले, माझा विश्वासच बसेना माझ्या डोळ्यांवर. हिला मी कायम टापटीप अवस्थेत पाहिलेले. अगदी भाजीला निघाली तरी लिपस्टिक लावल्याशिवाय बाहेर न पडणारी ही अशा अवतारात? पटकन सावरून तिला म्हटले, ‘‘अगं, मी तुला पाहिले मागून, पण खरंच ओळखले नाही. मी कशाला टाळेन तुला?’’ मी मनापासून म्हटले.

थोडी जुजबी चौकशी झाल्यावर तिने अचानक विचारले, ‘‘ए, तुझा मुलगा बाहेर असतो नं?’’

मी होकारार्थी मान हलवल्यावर ती म्हणाली, ‘‘तू किती लकी?’’ मला काही कळेचना. म्हटलं, ‘‘अगं, त्यात काय, आजकाल घरोघरची मुलं परदेशात असतात. त्यात कसली नवलाई?’’ ती म्हणाली, ‘‘त्यासाठी नाही म्हणत मी. अगं, तुला कल्पना नाही, नोकरी करणाऱ्या मुलं, सुनांचा संसार सांभाळण्यासाठी काय तारेवरची कसरत करावी लागते ती? आपणही नोकरी केली; पण आपला संसार, मुलं यांचे प्रश्न आपणच सोडवले. तुझ्यामाझ्या नोकऱ्याही अशा होत्या, की जायच्या- यायच्या वेळा ठरलेल्या होत्या. आता तसं नाही. ही मुलं एकदा सकाळी बाहेर पडल्यावर रात्री कितीही उशिरा घरी परत येतात. त्यात शनिवार-रविवारी त्यांचे बाहेर जायचे कार्यक्रम आधीच ठरलेले असतात.

माझी मुले लहान असताना पाळणाघरात ठेवली होती, म्हणून नातवंड झाल्यावर मुलाला म्हटले, ‘मी सांभाळीन त्यांना.’ मनात कुठे तरी अपराधीपणाची भावना होती ना? शिवाय नातवंडांची ओढ आहेच. वाटले, आपण नोकरी करीत असताना आपल्याला मुलांना मनासारखं नाही वाढवता आले, त्याची भरपाई नातवंडांना सांभाळून करायची; पण मी हा विचार केला नव्हता, की घर, संसार, नोकरी, मुलं या घाण्यात मी किती पिसून निघणार आहे. आता म्हटलं तर वय खूप झालंय असेही नाही, पण शरीर साथ देत नाही. त्यातून माझा नवरा हुशार! निवृत्त झाल्या दिवशी सांगून टाकलं, ‘आयुष्यभर खूप कष्ट केले, आता फक्त आराम करणार. माझा वेळ माझ्यासाठी!’ अगं, खरंच तो कशाकडेही ढुंकून पाहत नाही. अगदी नाही म्हणायला लहर लागली की खेळतो नातवंडांबरोबर.’’

मी फक्त श्रोत्याची भूमिका घेतली होती. खरं तर एवढं मनमोकळं बोलण्याएवढी तिची माझी मैत्री वगैरे नाही; पण कधी कधी असा आतून कढ येतो, की कुणाजवळ तरी व्यक्त व्हावंसं वाटतं, तसं तिचं झालं होतं. मी फक्त ऐकत होते.

ती बोलतच होती, ‘‘ज्यांची मुलं परदेशात आहेत ते लोक खरंच लकी. आता काय कधीही मनात आलं, की तुम्ही तरी तिथे जाता, नाही तर ते तरी इथे येतात. इथे तुम्ही तुमचं आयुष्य मनासारखं जगत असता. कसली जबाबदारी नको. हे असं सकाळी उठून चित्रपटाला जायचा विचार मी स्वप्नातही करू शकत नाही. उलट ही बंधनं उगाचच लादून घेतली की काय असं वाटायला लागलंय; पण आता यातून बाहेरही पडता येईलसे वाटत नाही.’’

मला राहवेना. मी म्हटलं, ‘‘अगं, ही तुझी नातवंडं कायमची लहान राहणार आहेत का? मुलं काय पटकन मोठी होतात.’’

‘‘चुकीची कल्पना आहे तुझी. शाळा आणि क्लासेसना सोडायच्या व्यापातून सुटका झाली तरी इतर डिमांड्स वाढतच राहतात. शिवाय आपल्या निवृत्तीनंतरची ही अगदी मोजकीच वर्ष आपल्या हातात असतात, जेव्हा शरीर साथ देते, त्यामुळे मनही उत्साही राहते. मग इतकी वर्ष मनात दाबून ठेवलेल्या सगळ्या गोष्टी आता कराव्याशा वाटतात. सकाळीच हातात कॉफीचा कप घेऊन निवांत वर्तमानपत्र वाचण्यात जो ब्रह्मानंद असतो तो कधी तरीच वाटय़ाला येतो. हे असं गुंतून राहून नातवंड मोठी होण्याची वाट पाहीपर्यंत आपली काय गॅरंटी? शिवाय जगलो वाचलो तरी शरीरानं साथ द्यायचं नाकारलं तर?’’ तिला मधेच थांबवत मी म्हटलं, ‘‘प्रत्येक प्रश्नावर उत्तर असते. आपण ते फक्त शोधायचे असते. तू पूर्णवेळची मदतनीस ठेवू शकतेस, शाळेतून नातवंडांना ने-आण करण्यासाठी कुणाला ठेवू शकतेस, स्वयंपाकाला बाई ठेवू शकतेस. तुला कोण नाही म्हणणार आहे? आपल्याला इथे हे सारं शक्य आहे. परदेशात हे असले चोचले नाही पुरवता येत. तरी आता अमेरिकेतही जरा शेकल्यावर मऊसूत होणाऱ्या तयार पोळ्या मिळतात. आपल्याला शक्य असेल त्याप्रमाणे १/२ आठवडय़ांनी क्लिनिंग लेडी बोलावून पूर्ण घर आतून-बाहेरून आरशासारखं लख्ख करून घेता येतं. रोजचे केरवारे आणि हाताने भांडी घासण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही.

जिथे रोज मदत शक्य नसते तिथेही आता हे सहजशक्य झालं आहे. मग आपल्या भारतात तर मदतनीसांकडून काम करून घेणं जणू आपल्या जीवनाचा अविभाज्य भागच असताना एवढं हवालदिल होण्याचं कारणच नाही. माझी खात्री आहे तुझा मुलगा व सून नाही म्हणणार नाही. त्यातूनही म्हटलंच तर आपले पैसे आहेत की आपल्याजवळ. आपल्यानंतर ते त्यांचेच आहेत. मग आताच त्यातले थोडे खर्च केले तर दोघांनाही फायदा.’’

ती पटकन म्हणाली, ‘‘छे! छे! अगं, या मुलाचा-सुनेचा काय भरवंसा? मी काम करते, तोवर राहतील गोड. ही नातवंडं जरा मोठी झाली, की आमची गरज संपली आणि त्या वेळी नाही पटलं आमचं तर हा पैसाच उपयोगाला येईल ना?’’ मला काही उमगेना! आपला पैसा आपल्याजवळ हवा हे खरंच, पण आपल्या मुलांकडेदेखील आपण अशा नकारात्मक विचारांनी, संशयाने, अविश्वासाने पाहिलं तर कसे चालेल? यावर नेमकी काय प्रतिक्रिया द्यावी ते न समजून फक्त म्हटलं, ‘‘तू असा विचार करू नको, जरा पॉझिटिव्हली घे.’’

‘‘तुला आपल्याकडचा अलीकडच्या काळातला अनुभव नाही, म्हणून तू असं म्हणतेस. आजूबाजूला पाहा जरा. वरून सारं साजरंगोजरं दिसतं, पण त्याचं कारण आमच्यासारख्या स्त्रिया नाही करवत तरी करत राहतो. पण मग आम्हाला गृहीत धरलं जातं. आजीआजोबांनी नातवंडांचं केलं तर काय बिघडलं? हा त्यामागचा विचार! आजीआजोबांनादेखील नातवंडांचं करताना आनंदच वाटतो की, पण त्यात अपरिहार्यता येते. पूर्ण जबाबदारी कळत नकळत सोपवली जाते, तेव्हा वाढत्या वयाबरोबर सारं डोईजड होत जातं, पण बोलायची सोय नाही. तोंड दाबून बुक्क्यांचा मार.’’

मी अंतर्मुख होऊन विचार करू लागले. माझ्या समवयस्क मैत्रिणींकडून मी बरेच कडू-गोड अनुभव ऐकले होते, पण ही सल इतकी खोलवर असेल असं कधी वाटलं नव्हतं.

मलाही एक नात आहे. तिचे लाडकोड करण्याइतका आनंद मला कशातच मिळत नाही. परदेशात मुला/सुनेकडे कितीही काळ राहिले तरी हा असला अनुभव मला कधीच आला नाही. मला वाटतं दुसऱ्याकडून केलेल्या अवास्तव अपेक्षा हेच या दुखण्याचं मूळ कारण असावं.

आपल्याकडे हे असं घरोघरी घडतं असंही नाही. काही उदाहरणांनी इथल्या मुलांविरुद्ध तलवार उपसण्याचा उद्देशही नाही, पण अनेकदा समाजमाध्यमातून परदेशात असलेल्या मुलांविषयी ज्या खऱ्या/खोटय़ा कथा चविष्टपणे फॉरवर्ड केल्या जातात तेव्हा कीव करावीशी वाटते. त्या कथाही कशा? तर परदेशातला मुलगा येतो, आईवडिलांचे घरदार गुपचूप विकून पैसे घेऊन जातो किंवा आईवडील वाट पाहून मरतात, पण परदेशातून मुले येतच नाहीत वगैरे वगैरे. त्यात पूर्ण तथ्य नसतेच असं नक्कीच नाही, पण सरसकट खरेही नसते आणि मुख्य म्हणजे  सगळ्यांच्या बाबतीत होईल असेही नाही.

आमच्यासारख्या अनेक आईवडिलांचे लाड परदेशात किती मजेशीर प्रकारे केले जातात त्याचा एक मासला. एकदा ऐन थंडीत मी माझ्या मुलाकडे गेले होते. अगदी बर्फ वगैरे पडत नसला तरी मुंबईतल्या लोकांसाठी ती कडाक्याची थंडीच म्हणायची. घरात हीटर असला तरी तो सारखा चालू ठेवला की माझे डोके दुखू लागायचे. रात्री झोपताना तर थंडगार अंथरुणाने हुडहुडीच भरायची. माझ्या सुनेने कुठल्याशा टी.व्ही. शोमध्ये पाहिलेली क्लृप्ती मुलाला सांगितली. माझी झोपायची वेळ झाली की, माझ्या अंथरुणावरची चादर, पांघरूण, उशी, कपडय़ांच्या ड्रायरमध्ये थोडा वेळ गरम करून, दोघेही पटापट चादर गादीवर अंथरून उशी ठेवून, मला झोपायला सांगायचे. वरून गरमागरम पांघरूण. मस्त उबदार वाटायचं. मी रोज रात्र कधी होते याची वाट पाहायचे. हा माझ्या झोपेचा सोहळा मला जो आनंद देत होता तो मी कधीच विसरू शकत नाही.

माझ्या मुलाचे, सुनेचे सर्वच मित्रमैत्रिणी आपापल्या आईवडिलांची अगदी बारकाईने लक्ष देऊन काळजी घेतात हे मी स्वत: अनुभवलंय. कदाचित असेही असेल की, समविचारी असल्याने त्यांची मैत्री जुळली असेल.

आपल्याकडेही आईवडिलांची पुंडलिकाप्रमाणे सेवा करणारी किती तरी मुले, मुली आहेत. इथली आव्हाने वेगळी, त्यांचीही दमछाक होत असेल. कदाचित एकमेकांना खूप गृहीत धरलं जात असेल किंवा अवास्तव अपेक्षा ठेवल्या जात असतील. मात्र कुठे तरी काही तरी चुकते एवढं नक्की.

केवळ मुले दूर राहतात म्हणून इथल्या आईवडिलांची कीव करण्यापेक्षा आपल्या पायाखाली काय जळतंय हे पाहण्याची वेळ आली आहे का?

meenadinesh19@gmail.com

chaturang@expressindia.com

Story img Loader