‘फायर इन द बेली’ या वाक्प्रचाराचा एक अर्थ एखादी गोष्ट करण्याची जिद्द किंवा वेड असा असतो, हे कमलाला माहीत होतं; पण हा वाक्प्रचार आपल्या बाबतीत शब्दश: खरा ठरेल याची मात्र तिला सुतरामही कल्पना नव्हती. कमलाचा नवरा, विश्वास त्यांच्या बंगल्याच्या फाटकाबाहेरच्या रस्त्यावर कारमध्ये बसला होता. त्याने कार सुरू करून काही मिनिटं झाली होती. मोबाइल फोन पाहत असतानाच त्याचं लक्ष स्क्रीनवरच्या घडय़ाळाकडे गेलं. त्याने जोरात हाक मारली, ‘‘ए कमला, चल आता. ऑलरेडी लेट झालाय.’’
त्याची चढय़ा आवाजातली हाक ऐकून कमला दचकली. तिने तिच्याशेजारी झोपलेल्या आपल्या मुलीला समजावलं, ‘‘राधा, मी आलेच हा जाऊन बाबांबरोबर. तू झोप. सकाळी स्कूलला जायचंय ना. काही लागलं, तर ग्रँडमाला सांग.’’
‘‘हो,’’ एवढंच म्हणून राधा तिच्याकडे म्लानपणे पाहत राहिली. त्या नजरेतल्या वेदनेचा, भीतीचा कमलाला थांग लागेना; पण पुन्हा एकदा हॉर्नचा आवाज ऐकल्यावर राधाला सोडून कमलाला निघावंच लागलं. ती साडी सावरत भरभर पायऱ्या उतरत हॉलमध्ये आली. तिची सासू दारात उभी होती. तिला नमस्कार करत कमला म्हणाली, ‘‘राधा झोपायला आलीये, पण जरा बसा तिच्याजवळ.’’
‘‘यशस्वी भव!’’ असं म्हणत सासूने कमलाला आशीर्वाद दिला आणि मान डोलावली.
कमला घाईत फाटकाबाहेर उभ्या असलेल्या कारकडे धावत गेली. तेव्हा सासू म्हणाली, ‘‘अगं, हळू जरा. अजून तिसरा महिना भरायचाय. जपावं या दिवसांत. निदान आज तरी.’’ पण कमलाने सासूचं ऐकलं नाही. तिच्या नवऱ्याचा पारा चढला होता. झटकन कारचं दार उघडून ती आत बसली. तिला मळमळलं. पण तिने ते आत दाबून टाकलं आणि कशीबशी ‘‘चला’’ म्हणाली.
विश्वासने मोबाइल ठेवून सीटबेल्ट लावला. गिअर टाकून झपकन कार पुढे नेत वेगाने मुख्य रस्त्याला लागला. कारच्या वेगामुळे आणि बसणाऱ्या धक्क्यांमुळे कमलाने मघाशी दाबून टाकलेला उमासा पुन्हा वर उसळला. तिने ‘व्हॅक’ असा आवाज करत हात तोंडावर ठेवला.
‘‘आता काय? यात परत वेळ जाणार की काय!’’ विश्वास त्रासून म्हणाला.
उलटीच्या उबळेने आलेलं डोळ्यांतलं पाणी पुसत कमला जरा रागाने म्हणाली, ‘‘अहो, आता उलटी होणं नॅचरलच तर आहे ना? त्याला मी काय करू? राधा, झोपत नव्हती. तिला अशीच सोडून आले असते तरी बोलला असतात.’’
विश्वास जरासा निवळला. म्हणाला, ‘‘अगं, मोठय़ा मेहनतीने आज अपॉइंटमेंट मिळालीये. वेळ बरोब्बर बाराची मिळालीये. एवढय़ा रात्री ट्रॅफिक नाही म्हटलं, तरी वीस मिनिटं लागतीलच.’’
‘‘पाच मिनिटांनी काय फरक पडतोय?’’
‘‘खूप पडतो. बाराच्या आत तुम्ही हजर नसाल तर तुम्हाला आत घेत नाहीत म्हणे. म्हणून तर एवढा सुसाट चाललोय.’’
‘‘पण खात्रीशीर असतं ना सगळं. नाही तर म्हणायचे एक नि व्हायचं वेगळंच.’’
‘‘फुलप्रूफ! आमच्या ऑफिसातल्या देशमुखांनी त्यांच्या मुलीच्या तिसऱ्या प्रेग्नसीच्या वेळेस हा उपाय करून पाहिला होता. परफेक्ट निदान आलं. त्यांच्यामुळेच लागलाय आपला नंबर. ते या दवाखान्याचे गुप्त एजंट आहेत.’’
‘‘ओके,’’ असं म्हणून कमलाचे हात नकळत आपल्या पोटापाशी गेले. तिला वाटलं, आपलं पोट आतून गरम होऊ लागलंय.
दवाखाना असं म्हटल्यावर डोळ्यांसमोर जे काही येतं, तसं तिथे काहीही नव्हतं. तो एक जुना वाडा होता. जरा आडबाजूला, झाडीत असल्याने तिथे अंधारं-अंधारं होतं. मुख्य वाडय़ापाशी किंवा फाटकावर कसलीही पाटी वगैरे काहीही नव्हतं. फाटक उघडून दोघं जण आत गेले आणि भराभरा चालत वाडय़ाच्या मुख्य दरवाजापाशी जाऊन पोचले. वाडय़ाच्या सगळ्या खिडक्यांवर काळ्या फिल्म्स लावून त्या गच्च बंद केलेल्या होत्या. प्रकाशाचा एकही किरण आत शिरणार नाही याची नीट काळजी घेण्यात आली होती. मुख्य दरवाजाही धातूचा आणि काळा होता. काही क्षण त्या दोघांना तो नेमका कुठे आहे हे समजलंच नाही. नजर सरावल्यावर तिथे एक काळा स्क्रीन असल्याचं विश्वासला दिसलं. काही तरी आठवून त्याने आपला मोबाइल फोन काढला आणि त्यावरचा एक क्यूआर कोड त्या स्क्रीनवर धरला. तो हळूच कमलाला म्हणाला, ‘‘सीक्रेट राहावं म्हणून असा कोड पाठवला जातो आणि तो स्कॅन झाल्यावर आपोआपच इनव्हॅलिड होतो.’’
कमलाने नुसतीच मान हलवली. क्यूआर कोड स्कॅन झाल्या-झाल्या काळ्या दरवाजाचे दोन भाग झाले आणि प्रत्येक भाग आत सरकत गेला. आत नुसताच काळाकुट्ट अंधार दिसत होता. जरा अडखळतच विश्वास आत शिरला. त्याच्या मागोमाग कमला. ती आत गेल्या गेल्या दरवाजा बंद झाला. बाहेरून थोडाथोडका येत असलेला प्रकाशही संपून गेला. आत डोळ्यात बोट घातलं तरी कळणार नाही असा अंधार झाला.
कमलाने झटकन विश्वासचा हात हातात धरत विचारलं, ‘‘असला कसला दवाखाना हा?’’ तिला आता आपल्या पोटात शेकोटी पेटवली गेली असावी असं वाटत होतं.
‘‘लेट्स सी,’’ असं म्हणून विश्वास जरा वेळ थांबला. तोच त्यांच्यासमोरच्या जमिनीवर पांढरे एलएईडी दिवे पेटले. ते दुतर्फा होते, जसं काही ‘या रस्त्याने पुढे जा’ असं सांगत होते. ते दोघं त्या रस्त्यावरून आत जाऊ लागले. ते जसजसे पुढे पुढे जात होते, तसतसे मागचे दिवे बंद होऊन अंधार होत होता. कमलाला वाटलं, हा अंधार आपल्या पाठीला चिकटून राहील. म्हणून जणू अंधाराला दूर ढकलण्यासाठी ती सारखा एक हात झटकत होती.
ते काही मिनिटं चालत राहिले आणि अखेरीस पुन्हा एक काळा दरवाजा लागला. तिथे विश्वासने त्याच्या फोनवर आलेला एक क्रमांक टाकला आणि दरवाजा उघडला. आत पहिल्यांदा दिसला तो मंद स्पॉटलाइट टाकल्यागत असलेला बेड, एक मॉनिटर आणि बेडच्या खालच्या अंगाला उभा असलेला रोबोसारखा दिसणारा एक माणूस. त्याने जांभळट-करडय़ा रंगाचा गाऊन घातला होता, तोंडावर काळा मास्क लावला होता आणि डोळ्यांवर लाल रंगाच्या काचांचा गॉगल चढवला होता. त्याच्या काचा अपारदर्शक असल्याने त्याचे डोळे दिसत नव्हते. लाल काचांवरून स्पॉटलाइटचा पिवळा प्रकाश परावर्तित होत होता. कमला मनातल्या मनात म्हणाली, इथे विचित्रसा- रक्ताचा वास येतोय. तिच्या पोटात कसंतरीच झालं.
त्या माणसाने यांत्रिकपणे कमलाला सांगितलं, ‘‘झोपा.’’
कमलाने विश्वासकडे पाहिलं. त्याने मानेनेच होकार दिला. ती बेडवर आडवी झाली. त्या माणसाने तिचा पदर बाजूला केला. ओटीपोट उघडं केलं. तिथल्या अंधारासारखाच तो स्पर्श निर्विकार, थंड असल्याचं कमलाला जाणवलं. त्याचे रबरी हातमोजे गार होते. तिच्या पोटातली वाढत जाणारी उष्णता आणि तो रबरी गारपणा अशा विरुद्ध जाणिवांमुळे तिला कसंतरीच वाटलं.
त्या माणसाने एक प्रोब तिच्या पोटावर ठेवला. काही क्षणात तो प्रोब वितळून गेला. मग तो तडक खोलीतल्या अंधाऱ्या कोपऱ्यात गेला. तिथे एक कपाट होतं. त्यातून त्याने एक वेगळा प्रोब आणला. तो जास्त मोठा आणि अणकुचीदार होता. तो जास्त टणक व थंड असल्याचं कमलाला जाणवलं. जणू तो प्रोब हिमनगातूनच कोरून काढला असावा. नवा प्रोब तिच्या पोटावर ठेवल्या-ठेवल्या चर्र असा आवाज झाला. मग तो माणूस एकटक बेडच्या वरच्या बाजूला असलेल्या स्क्रीनकडे पाहत राहिला. त्याने दोन-तीनदा प्रोब इकडे-तिकडे केला आणि म्हणाला, ‘‘झालं. जा तुम्ही.’’
कमला गोंधळून उठली. तिने साडीच्या निऱ्या वर ओढत विचारलं, ‘‘काय ते सांगा तर..’’ पण तो माणूस काहीच बोलला नाही. त्याने फक्त विश्वासकडे पाहिलं. विश्वासने कमलाचा हात धरून तिला ओढतच बाहेर नेलं. ओटीपोटातल्या उष्णतेसारखा, कमलाच्या मनात तिला पडलेला प्रश्न धुमसत राहिला.
‘‘एसएमएस येतो. तो आला नाही, तर समजून जायचं..’’ कारमध्ये बसताना विश्वासने कमलाला सांगितलं. तोच त्याचा मोबाइल फोन वाजला. ‘‘शिट्,’’ असं म्हणत त्याने मेसेज वाचला. तो कमलाला म्हणाला, ‘‘उद्या सकाळी बाराला पुन्हा इथंच. उद्या सुट्टी घ्यावी लागेल.’’ वाटेत विश्वास काहीच बोलला नाही, ना कमला; पण तो रागाने एवढय़ा जोरात गाडी चालवत होता, की त्या हिंदोळ्यांनी कमलाच्या पोटात ढवळू लागलं आणि तिने जागीच व्हॅककन् उलटी केली. अर्धवट पचलेल्या अन्नाचा, आम्लांचा वास कारच्या एसीबंद हवेत कोंदटला. विश्वासने करकचून ब्रेक्स दाबले. कसं तरी बाहेर पडून रस्त्याच्या कडेला जात कमला दोनदा ओकली.
घरी गेल्यावर कमला गादीवर पडली खरी, पण बराच वेळ तिला झोपच लागली नाही. ती राधाच्या केसांमधून हळुवारपणे हात फिरवत राहिली. तिने एकदा विश्वासकडे पाहिलं, तर तो तोंड उघडं टाकून गाढ झोपला होता. तिला वाटलं, आपण चूक करतोय का? मग तिने राधाकडे पाहिलं. ती शांत झोपली होती. तिला वाटलं की, सारखी बाळंतपणं काढण्यापेक्षा हे बरंय. एकदा दिला वंशाचा दिवा की सुटलो. नाही तर नुसता वैताग. उलटय़ा, मळमळ. पेन्स.. ती विचार करता करता अर्धग्लानीत गेली.
कमलाला दिसलं, आपलं पोट वाढत वाढत जातंय. फुग्यासारखं फुगतंय. ते आपल्या अंगावर येतंय. त्याने आपली छाती दडपून गेलीये. पोट नुसतंच फुगत नाहीये, तर आतली धगही वाढत जातीये, गरम जाणवतंय. उष्ण. असं वाटतंय की कोणी तरी आत स्टोव्ह पेटवलाय, झपाझपा पंप मारून त्याची ज्योत वाढवली जातेय, रॉकेल ओतलं जातंय.. होळी रे होळी.. केवढी ही धग, चटकाच बसतोय. भाजतंय अंग, आँ!
आपलं पोट लालबुंद झाल्याचं तिला दिसलं; निखाऱ्यासारखं. गोल गरगरीत उष्ण निखारा आणि हे कोण? तिनं शेजारी पाहिलं – तिची सासू. ती कमलाच्या पोटावर मांडे भाजत होती. मग झटकन एक मांडा काढून विश्वासच्या पानात टाकला. अहाहा! म्हणत विश्वासने मांडा चवीने खाल्ला. मग सासू म्हणाली, खाऊन घे आत्ताच. मी तर आठवडय़ाभराच्या भाकऱ्या-पोळ्या सगळंच भाजून ठेवणार आहे आत्ताच. गॅस वाचेल.
आणि पोटाचा स्फोट, मोठ्ठा स्फोट! वाफ!
कमलाला कळलं नाही, हे स्वप्न आहे की सत्य, ग्लानी आहे की जाग.. तिला काही तरी जळत असल्याचा वास आला. तिने पाहिलं, खोलीतले पडदे पेटलेले. तिने उठू पाहिलं, पण तिला उठता आलं नाही. तिला मांस जळाल्याचा वास आला. तिने शेजारी पाहिलं, तर विश्वासने पेट घेतलेला; पण तरी तो आरडाओरडा न करता शांत झोपलेला होता. तो कापरासारखा भुरूभुरू पेटत जात होता. मग राधा तिथे नसल्याचं तिला कळलं. तिने नि:श्वास सोडला. शांतपणे पलंगावर झोपली, जसं काही ती चितेवरच झोपली असावी. तिला आठवलं – फायर इन द बेली. ती हसली. गाऊ लागली, ‘‘पोटातला वणवा माये पसरू दे, जगाचा डोलारा राख राख होऊ दे..’’
– प्रणव सखदेव
sakhadeopranav@gmail.com
chaturang@expressindia.com