‘‘अय्या..या गणपतीचा एक दात तुटलाय!’’  नटीच्या या उद्गारावर दिग्दर्शक दचकला. एरवी समाजात विचारवंत म्हणून मिरवणाऱ्या या नटीला घेऊन चित्रीकरण करताना आपली चारचौघांत इज्जत जाते की काय असं वाटून त्यानं आजूबाजूला बघितलं. त्याच्या सुदैवानं सूरजमल चांदमल ज्वेलर्सच्या सिल्व्हर सेक्शनचे सेल्समन्स आपापले ग्राहक आणि रिकामे लोक शूटिंग बघण्यात गुंग होते. पण विविध प्रकारचे गॉगल्स लावून सेल्फीमय असणाऱ्या शेजारच्या नटाचं मात्र तिच्या वाक्याकडे लक्ष गेलं.

‘‘अगं गणपतीचा एक दात नेहमीच तुटका असतो. आमच्या मंडळातपण असाच आहे गणपती.’’

अच्छा. म्हणजे ही मंडळाच्या कार्यकर्त्यांची नजर आहे तर. तरीच म्हटलं याला एवढं सामान्य ज्ञान कुठलं असायला? दिग्दर्शक शांतपणे सिल्व्हर सेक्शनच्या मध्यभागी ठेवलेल्या त्या पाच फुट उंच चांदीच्या गणपतीजवळ उभ्या असलेल्या त्या दोघांजवळ गेला आणि त्यानं गणपतीला एकच दात का असतो त्याचे संदर्भ सांगायला सुरुवात केली. देवांतक, परशुराम किंवा रावण यांच्याशी युद्ध झालं तेव्हा किंवा कार्तिकेयाशी खेळताना गणपतीचा दात तुटला वगैरे पौराणिक ‘दंत’कथाही सांगितल्या. ‘आपण नाही का एकदंत म्हणत गणपतीला?’ या त्याच्या वाक्यावर नटाने ‘काय कल्पना नाही बुवा’ अशा अर्थाचे खांदे उडवले आणि नटीनं आपल्या बॉयला हाक मारून पर्स ताब्यात घेतली आणि त्यातला मोबाइल काढून व्हॉट्सअ‍ॅप चेक केलं.

‘‘डोनाल्ड ट्रम्पचा मेसेज येणार आहे का?’’ दिग्दर्शकानं खवचटपणे विचारलं.

‘‘नाही रे. का?’’ नटीनं मोबाइल बॉयकडे परत देत विचारलं.

‘‘नाही, शूट चालू असतानाही सारखा मोबाइल चेक करतीयेस म्हणून विचारलं.’’

‘‘एवढे टॉन्ट्स कळतात बरं मला. युसलेस!’’ नटीनं लटक्या रागानं दिग्दर्शकाकडे बघितलं. आणि ठेवणीतलं हसू आणून ठेवणीतला संवाद म्हटला- ‘‘चलो डार्लिग, टेक करू या पटकन.’’ दिग्दर्शक कॅमेरामनला सूचना द्यायला वळणार एवढय़ात नटीनं त्याला पुन्हा हाक मारली- ‘‘बाय द वे, ही डोनाल्ड ट्रम्प कोण?’’

आता मात्र दिग्दर्शकाचा धीर खचला. त्याच्या सुदैवानं आसपास सूरजमल चांदमल ज्वेलर्सकडचे सेल्समन्स, त्यांची गिऱ्हाइकं आणि स्वत: मालक सूरजमल चांदमल यांचा चालू वंशज (जो काय मंगळमल वगैरे असेल तो), एवढेच लोक असल्याने त्यांचा संवाद कुणी ऐकला तरी फरक पडला नाही. शिवाय नटी प्रसिद्ध होती. तिची एक दर्जेदार मालिका एका दर्जेदार वाहिनीवर चालू होती. (या दोन्ही गोष्टी दर्जेदार आहेत असं त्या वाहिनीनेच ठरवल्यामुळे प्रेक्षकांनाही पटलेलं होतं. कारण प्रेक्षकही तितकेच दर्जेदार होते!) आणि या सगळ्या दर्जामुळेच दिवाळी शॉपिंग फेस्टिव्हलच्या मार्केटिंग टीमनं फेस्टिव्हलमध्ये सहभागी सर्व दुकानांमध्ये या नटीला आणि सध्या काहीच काम नसलेल्या दुसऱ्या एका नटाला घेऊन फिरवायचा उपक्रम हाती घेतलेला होता. ज्वेलरी आणि साडय़ांच्या दुकानांमध्ये या दोघांनी फिरायचं, शॉपिंगचा अभिनय करायचा आणि समाधानाने पायऱ्या उतरायच्या, की दुसरं दुकान. आणि हे सगळं रोज वाहिनीवर दाखवायचं म्हणजे त्याला एक दिग्दर्शकही लागणार. म्हणून मग हा दिग्दर्शक. त्यालाही बिचाऱ्याला वास्तववादी सिनेमासाठी पायपीट करण्यापेक्षा अशा अवास्तव कामाचे बरे पैसे मिळतात याचा साक्षात्कार नुकताच झाला होता.

आधी तर त्याला हातात सतत पुस्तक बाळगणाऱ्या या नटीबरोबर काम करायचं टेन्शन आलं होतं. पण पहिल्याच दिवशी ते गेलं. कारण दागिन्यांच्या अशाच एका दुकानात यानं ‘मला आधी वाटायचं की मोहनमाळ हे नाव गांधीजी तशी माळ वापरायचे त्यावरून आलं असावं’ असा विनोद करण्याचा प्रयत्न केला. त्यावर तिनं तत्परतेनं ‘मग नाहीये का तसं?’ असं आपल्या कोरीव भुवया उंचावून विचारलं होतं. अधिक निरीक्षण केल्यावर त्या नटीच्या हातातलं पुस्तक आणि त्यातला बुकमार्क ही तिच्या पर्ससारखीच एक अ‍ॅक्सेसरी आहे हे त्याच्या लक्षात आलं. फावल्या वेळेत आपण गॉसिप करत नाही तर पुस्तक वाचतो याची सगळ्यांनी नोंद घ्यावी अशी काळजी नटी व्यवस्थित घेत असे. शॉट संपला की आपल्या बॉयला हाक मारून आपलं पुस्तक ताब्यात घ्यायचं. त्यानं पुढे केलेल्या खुर्चीवर बसायचं आणि बुकमार्क काढून ऐटीत सगळ्यांना दिसेल असा हातात घेऊन मन लावून पुस्तक वाचत बसायचं. तिचा बुकमार्कही डिझायनर होता. त्यावर तिचाच कुठल्याशा मालिकेतला फोटो आणि त्यातलाच एक डायलॉग छापला होता. तो म्हणे खूप गाजला होता. तिनं पहिल्याच दिवशी उत्साहानं दिग्दर्शकाला आपला बुकमार्क दाखवला होता. शिवाय तो जगप्रसिद्ध डायलॉगही मुद्दाम वाचायला सांगितला होता. तिचा फोटो बरा होता पण त्याखाली ‘मन म्हणजे ना, तरल पिसासारखं असतं.. जणू जाईच्या कळ्या ओल्या-’ पुढलं त्याला वाचवलं नाही. त्याऐवजी त्याला सुरेश भटांच्या ‘तुमची तुम्ही करा आरास अन् तुमचे तुम्ही लावा दिवे’ या ओळी आठवल्या. तो तिला त्या सांगणारही होता. पण कोण सुरेश भट, असं तिनं विचारलं तर काय घ्या, असं वाटून तो गप बसला.

त्यामानानं नट बरा होता. मी आणि माझे लुक्स यावर तो खूश होता. विचारवंतपणाची इमेज समाजात तयार करण्यात काही फायदा असतो एवढा विचारसुद्धा त्याच्याच्यानं होत नसे. शिवाय प्रत्येक शॉटनंतर तो बॉयला हाक मारायचा नाही. कारण त्याला स्वत:चा बॉयच नव्हता. मात्र नटीचा तो वैयक्तिक बॉय म्हणजे वैताग होता. कायम तिच्यामागे हा तिची पर्स, छत्री आणि पाण्याची बाटली घेऊन फुलाफुलांचा शर्ट प्यांटमध्ये खोचून उभा राही. नटीला शॉट समजावून सांगत असताना दिग्दर्शकाकडे तो अगदी आर्त नजरेनं बघायचा. काही समजत होतं म्हणावं तर तेही नाही, कारण त्याला मराठीचं अक्षरही कळत नसे. पण त्याला ड्रायव्हिंग येत होतं आणि नटीच्या वस्तू हातात घेऊन तासन् तास तिच्यामागे उभं राहण्याची योगसाधना त्याला जमली होती. ‘हॉटेलमध्ये हा खूप बिल करतो. शूट संपू दे, याला घेतो खोपच्यात’ असं प्रॉडक्शनचा माणूस दिग्दर्शकाच्या कानात दुसऱ्याच दिवशी कुजबुजून गेला होता. हा बॉय नामक प्रकार त्याच्या कायमच डोक्यात जात असे. या नट-नटय़ांच्या मागे कायम छत्री आणि पाणी, पर्स, मोबाइल वगैरे घेऊन उभं राहण्यामागे त्यांना कुठली अज्ञात शक्ती प्रेरणा देत असेल याचं त्याला कायम कुतूहल वाटायचं.

‘‘सर शॉट रेडी आहे.’’ साहाय्यकानं त्याला जवळ येऊन सांगितलं. त्यानं शांतपणे सूरजमल चांदमल ज्वेलर्सच्या सिल्व्हर सेक्शनमध्ये काय खरेदी करायची याच्या सूचना दोघा नटांना दिल्या आणि खरेदीच्या अभिनयानंतर टेक ओके केला. ‘‘सर, सारखं सारखं सूरजमल चांदमल म्हणू नका, आपण आता याला एससी म्हणतो. म्हणजे कसं मॉडर्ण वाटतं’’, शेवटचा ण पूर्ण उच्चारत एससीचा सध्याचा मालक बापाचं नाव मोठं केल्याच्या ऐटीत वाडवडिलांच्या नावाचा शॉर्टकट मारायला सांगत होता.

‘‘करेक्ट! एससी म्हणजे एकदम ट्रेंडी वाटतं. तुम्हाला अशा गोष्टींकडे अगदी बारकाईने लक्ष द्यावं लागत असेल नाही?’’ बॉयच्या हातातून पुस्तक घेत नटीनं मालकापुढे कमालीच्या उत्सुकतेचा अभिनय केला. सकाळीच मालकानं आता आम्ही एक ब्रँड अ‍ॅम्बेसेडर घेणार आहोत असं म्हटल्यामुळे तिला एवढी उत्सुकता दाखवणं भागच होतं. मालकही मग हौसेनं ज्वेलरीचं मार्केट, नोटाबंदीमुळे झालेला परिणाम, शिवाय जीएसटी वगैरे बोलायला लागला. जीएसटीचा विषय निघाल्यावर ही चर्चा ऐकत नुसताच उभ्या असलेल्या नटानं ‘जीएसटीचा आपल्याला काही त्रास नाही झाला. आपल्याला आधीपासूनच जी एसटी मिळेल त्या एसटीने जायची सवय आहे’ हा मराठी स्किटमधला सुमार विनोद केलाच! मालकाला (अर्थातच) तो कळला नाही. पण नटीने मात्र नटाकडे रागावून बघितलं. हातात बुकमार्क असलेलं पुस्तक असताना असे विनोद करायचे नसतात एवढी साधी अक्कल नटाला नव्हती याचं तिला वैषम्य वाटलं. हल्ली कुणीही उठतं आणि अभिनय करायला येतं असा चेहरा करून तिनं पुन्हा बुकमार्क चाळत मालकाकडे बघून चर्चेचा अभिनय पुढे सुरू ठेवला.

‘‘काय नं, मी परवा एका हिंदी सिनेमासाठी लुक टेस्ट दिली होती. त्याच विषयाच्या संदर्भातलं एक पुस्तक सध्या वाचतीये. हिंदीवाले खूपच पर्टिक्युलर असतात, यू नो! पण शेवटी मराठी ते मराठी.’’

‘‘प्रश्नच नाही. आम्हालापण आनंद शिंदेची गाणी खूप आवडतात. तुम्ही नाही का त्यांच्या सिनेमात काम करत?’’

‘‘मी स्क्रिप्ट बघूनच काम करते. शेवटी आपल्यालाही, म्हणजे काय, उगीच अभिनय काहीतरी केला असं नको..’’

यांच्या संवादाची गाडी नेमक्या कोणत्या रुळांवरून धावतेय तेच दिग्दर्शकाला उमजेना. ते ऐकण्यापेक्षा आपला शेवटचा शॉट घ्यायचाय त्या गोल्ड सेक्शनमध्ये एक चक्कर मारावी म्हणून तो पुढे निघाला. कोपऱ्यात नटीचा बॉय एका सेल्समनला ‘म्याडमका काम कितना जबरदस्त है’ ही गोष्ट सांगत होता. ‘मेरे बिना उनका शॉट ओकेच नही होता’ हे त्याचं वाक्य ऐकत तो लिफ्टमध्ये शिरला. त्या बॉयचा अजिजीने सारवलेला तुपेल चेहरा त्याच्या नजरेसमोरून जाईना. आयुष्यात काहीच जमलं नाही तरीसुद्धा आपण कुणाचा बॉय होणं शक्य नाही ही गोष्ट त्यानं मनातल्या मनात मान्य केली.

गोल्ड सेक्शनमधून पंधरा मिनिटांनी दिग्दर्शक परत आला तो त्याला प्रचंड आरडाओरड ऐकू आली. नटीचा बॉय तिची पर्स हातात धरून तिच्यापुढे नम्रपणे उभा होता आणि नटी त्याला भयंकर मोठय़ा आवाजात झापत होती. सिल्व्हर सेक्शनमधले सगळे लोक फुकटची करमणूक बघत होते. आपलीच अक्कल काढताना ‘म्याडम’चा घसा कोरडा पडलाय हे ओळखून बॉयनं तत्परतेने तिच्यापुढे पाण्याची बाटली उघडून धरली. ते पिऊन नव्या दमानं तिनं त्यालाच तिथून हाकलून दिलं.

‘‘काय झालं?’’ दिग्दर्शकानं विचारलं.

‘‘महामूर्ख आहे तो झालं. बावळट! अरे शूटिंग संपत आलं, माझं सामान आवरून ठेव म्हटल्यावर त्यानं माझं पुस्तक पर्समध्ये घालायचं ना? तर त्या गाढवानं पुस्तक आवरायचं म्हणून चक्क माझा बुकमार्क मी जे पान वाचत होते तिथून काढून पुन्हा पहिल्या पानामध्ये घालून ठेवला! बुकमार्क कशासाठी वापरतात ह्यचीसुद्धा अक्कल नाही गाढवाला!’’

‘‘सगळे बॉय असेच असतात.’’ नट हसत म्हणाला. दिग्दर्शकालाही हसू आवरेना.

‘‘अरे पण तो माझा बॉय आहे.. माझा.. त्याला समजायला नको?’’ नटी सात्त्विक संतापानं थरथरत होती.

‘‘एक गोष्ट सांगू का तुला?’’ दिग्दर्शकानं समजावण्याची भूमिका घेतली. ‘‘तो बॉय आहे. तुझी पर्स, पाणी, छत्री असं घेऊन तो दिवसभर तुझ्यामागे उभा असतो. जर त्याला बुकमार्क म्हणजे काय आणि तो कसा वापरतात हे समजायची अक्कल असती तर तो तुझी पर्स धरून तुझ्या मागे मागे फिरला असता का?’’

दिग्दर्शकाच्या या एकाच पण नेमक्या वाक्याने नटी एकदम भानावर आली. अ‍ॅक्सेसरी म्हणून का होईना, पण पुस्तकं जवळ बाळगल्यामुळे एवढं भान तिला नक्कीच आलेलं होतं.

‘‘पॉइंट आहे. राइट.’’ ती स्वत:शीच पुटपुटत म्हणाली.

‘‘नेक्स्ट टेक करू या?’’ दिग्दर्शकानं विचारलं.

‘‘इसे बुकमार्क कहते है.’’ बॉयकडे वळून ती म्हणाली- ‘‘इसे टचभी नही करना है तुमने. ओके?’’

म्याडम नॉर्मलला आल्या या आनंदानं बॉयनं मान डोलावली. सगळे पुढचा शॉट घ्यायला गोल्ड सेक्शनमध्ये जायला निघाले. नटीच्या मागोमाग चालत असलेला बॉयला मात्र पर्समधल्या पुस्तकात आपण बुकमार्क ‘नीट’ ठेवल्यामुळे आपलं नेमकं काय चुकलं हे अजूनही कळलेलं नव्हतं.

– प्रसाद नामजोशी

prasadnamjoshi@gmail.com

chaturang@expressindia.com

Story img Loader