मंगळवारी येथे सुरू झालेल्या ६६व्या कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांनी आपल्या मातृभाषेतून, हिंदीतून भाषण करून उपस्थित रसिकांची मने जिंकून घेतली.  ‘जागतिक श्रोत्यांसमोर हिंदी भाषेतून संवाद साधण्याची बाब आपल्यासाठी अभिमानास्पद आहे,’ असे उद्गार अमिताभने काढले. या महोत्सवात भारतीय चित्रपटाचे शतक साजरे केले जात आहे आणि म्हणूनच हा सोहळा अधिकच संस्मरणीय झाला आहे, असेही बच्चन यांनी आवर्जून नमूद केले. डिकाप्रिओ यांच्या समवेत आपल्याला या अत्यंत प्रतिष्ठित अशा महोत्सवाच्या उद्घाटनाची संधी हे आपले भाग्य आहे. हा क्षण आपल्यासाठी ऐतिहासिक आहेच, परंतु भारतीय चित्रपटसृष्टीसाठीही हा सोहळा अत्यंत सन्मानाचा असून आपल्याला त्याचा अभिमान वाटतो, असे बच्चन यांनी ट्विटरवर म्हटले आहे.
चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन
बाझ लुहर्मन्सच्या ‘द ग्रेट गेट्सबाय’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाने ‘कान चित्रपट’ महोत्सवास येथे मंगळवारी रात्री प्रारंभ झाला.‘गेट्सबाय’ मध्ये लिओनार्दो डिकाप्रिओ, कॅरी म्यूलिगन आणि टॉबे मॅग्यूर आदी कलाकारांचा समावेश आहे. या वेळी डिकाप्रिओ ‘गेट्सबाय’मधील आपले सहकलाकार आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासमवेत ६६व्या कान्स चित्रपट महोत्सवाच्या अधिकृत उद्घाटनाची घोषणा केली.
कान चित्रपट महोत्सव १२ दिवस चालणार असून या महोत्सवात जगभरातील अत्यंत महत्त्वाकांक्षी असे कलात्मकदृष्टय़ा उच्च दर्जाचे चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहेत. कान्स चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनाच्या पहिल्या दिवसावर प्रामुख्याने दोन घटकांचा प्रभाव होता. एक म्हणजे ‘बिग बजेट’ ठरलेला ‘गेट्सबाय’ आणि दुसरा म्हणजे हॉलिवूडचा प्रभावी दिग्दर्शक स्टीव्हन स्पिलबर्ग.
यंदाच्या कान महोत्सवात स्पिलबर्ग हे ज्युरी प्रेसिडेण्ट म्हणून जबाबदारी संभाळणार आहेत. स्पिलबर्ग यांना उद्घाटनच्या सोहळ्यात उपस्थित चित्ररसिकांनी उभे राहून मानवंदना दिली. अन्य ज्युरींमध्ये रोमानियन दिग्दर्शक ख्रिस्तियन म्युनजियू, स्कॉटिश चित्रपट निर्माते लीन रॅमसे, फ्रेंच दिग्दर्शक नाओमी कावासे, फ्रेंच कलाकार डॅनियल ऑटेयुइल आणि बॉलिवूडची अभिनेत्री विद्या बालन यांचा समावेश आहे.

Story img Loader