होमी अदजानिया दिग्दर्शित ‘फाइंडिंग फॅनी’ चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणारी एक याचिका दिल्ली उच्च न्यायालयात मंगळवारी दाखल करण्यात आली. चित्रपटातील ‘फॅनी’ या आक्षेपार्ह शब्दावरून सदर याचिका दाखल करण्यात आल्याचे समजते. शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या विरोधात दाखल केलेल्या जनहित याचिकेत चित्रपटाला देण्यात आलेल्या ‘युए’ प्रमाणपत्रालासुद्धा आव्हान देण्यात आले आहे. याबाबतची सुनावणी बुधवारी मुख्य न्यायाधीश जी. रोहिणी आणि न्यायाधीश आर. एस. एण्डलॉ यांच्या खंडपीठासमोर होणार आहे. नंदिनी तिवारी आणि जय जागृती फाऊंडेशन या सामाजिक संस्थेकडून दाखल करण्यात आलेल्या या याचिकेत ‘फॅनी’ हा शब्द वाईट अर्थाने वापरला जात असून, चित्रपट व चित्रपटातील गाणी, पोस्टर आणि बॅनरवरून या शब्दाचा उल्लेख काढण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. चित्रपटात वापरण्यात आलेला ‘फॅनी’ शब्द आक्षेपार्ह असून, सदर शब्दाच्या वापराने देशातील जनतेच्या खास करून लहान मुलांच्या भावना दुखावल्या जातील, असे त्यांचे म्हणणे आहे. याविषयी बोलताना नंदिनी तिवारी म्हणाल्या, दूरचित्रवाणी आणि चित्रपटातील अशा शब्दांच्या वापराने लहान मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होईल. सेन्सॉर बॉर्डाकडून देण्यात आलेल्या ‘यूए’ प्रमाणपत्राबाबत प्रश्न उपस्थित करीत चित्रपट व चित्रपटातील गाणी आणि पोस्टरमधून ‘फॅनी’ हा आक्षेपार्ह शब्द काढून टाकण्याचे निर्देश चित्रपटकर्त्यांना देण्याची तसेच चित्रपटाच्या प्रदर्शनावरील बंदीची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालय, चित्रपटाचे निर्माता, दिग्दर्शक आणि कलाकारांना याचिकेत प्रतिवादी करण्यात आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा