हल्ली नव्या ‘स्वस्त’ (चीप) पत्रकारितेच्या जमान्यात एखाद्या अभिनेत्रीने काय घातले (आणि घातले नाही!) अशी चर्चा सर्रास होते. असे चर्वितचर्वण करताना आपण त्या अभिनेत्रीबरोबरच एकूणच स्त्रीत्वाचाही अपमान करीत असतो याचीही तमा बाळगली जात नाही. ती अभिनेत्रीसुद्धा सहसा या चर्चेचा प्रतिवाद करण्याच्या भानगडीत पडत नाही. त्यामुळे प्रसारमाध्यमे आणखीनच वहावत जातात. सध्याची सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री म्हणून नाव कमावलेल्या दीपिकाने मात्र हिंमतीने या प्रकाराविरोधात ‘ब्र’ उच्चारला आहे.
त्याचे झाले असे. दीपिकाचा एक अंमळ अश्लील फोटो एका वृत्तपत्राने वेबसाइटवर झळकवला. अन्य अभिनेत्री चालवून घेतील तसाच हासुद्धा खपेल, अशी त्या वृत्तपत्राची अपेक्षा होती. परंतु दीपिकाने ठामपणे पुढे येत फोटो झळकल्यानंतर थोडय़ाच वेळात ‘ट्विटर’वर आक्षेप नोंदवला आणि आपल्या स्त्रित्वाचा सन्मान राखला. माध्यमांच्या सवंगपणाविरोधात दीपिकाने ‘ब्र’ उच्चारताच लागलीच बॉलिवूडसह सर्व थरातून दीपिकाला पाठींबा मिळाला.
‘माल-फंक्शन’ अर्थात ‘अंगावरील कपडे नको त्या वेळी, नको तिथे उसवणे अथवा घसरणे’ असे प्रकार बॉलिवूडमध्ये सर्रास घडतात. त्याचे फोटो प्रसारमाध्यमे चविष्टपणे दाखवतात. यावेळी मात्र दीपिकाने हा फोटो ‘अनुल्लेखाने मारला’ नाही. तर त्याविरोधात खणखणीत ‘आवाज उठवला’ आणि बोलण्याचे धाडस केले.
मुळात वेबसाइटवर झळकलेला हा फोटो वर्षभरापूर्वीचा होता. तशात तो चुकीच्या अँगलने काढल्याने दिसू नये तो भाग त्यात दिसत होता. त्यामुळे या फोटोवर आक्षेप घेत दीपिकाने ट्विटरवर ‘हो, मी स्त्री आहे आणि मला स्तन आहेत. यावर तुम्हाला आक्षेप आहे का?’ असा थेट प्रश्न विचारला. इतकेच नाही, ‘भारतातील आघाडीच्या वृत्तपत्राकडून अशा फोटोची अपेक्षा नव्हती. स्त्रीला सक्षम करण्याच्या गोष्टी करण्याआधी तिचा सन्मान करायला शिकण्याची जास्त गरज आहे’, असे तिने त्या वृत्तपत्राला सुनावले. तिच्या या कृतीवर जॅकलीन फर्नाडिस, दिया मिर्झा, अदिती राव हैदरी आदी अभिनेत्रींनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला. चित्रपटानिमित्त आयोजित समारंभ असो किंवा कोणतीही पार्टी असो, तिथे उपस्थित अभिनेत्रींचे ‘सौंदर्य’ टिपण्याऐवजी छायाचित्रकार तिच्या कपडय़ांमध्ये ‘डोकावण्या’च्या मागे असतात. एखाद्या बेसावध क्षणी त्या अभिनेत्रीच्या बसण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे किंवा अवघडलेले क्षण न चुकता टिपले जातात आणि त्याला ‘माल-फंक्शन’चे नाव देत सोशल मीडियावर ‘रेटिंग’ वाढवण्यासाठी अपलोड केले जातात. गेल्या काही काळापासून बॉलिवूडमधील कित्येक अभिनेत्रींबाबत हे प्रकार घडले असूनही त्याविरोधात कोणी आवाज उठवला नव्हता. परंतु या प्रकारामुळे एक स्त्री म्हणून असलेल्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवत आहोत, याकडे प्रसारमाध्यमे दुर्लक्ष करतात. आता दीपिकाच्या या प्रकरणामुळे या प्रकारास आळा बसेल, अशी आशा करायला हरकत नाही.
..आणि दीपिकाने खडसावले!
हल्ली नव्या ‘स्वस्त’ (चीप) पत्रकारितेच्या जमान्यात एखाद्या अभिनेत्रीने काय घातले (आणि घातले नाही!) अशी चर्चा सर्रास होते.
First published on: 16-09-2014 at 06:26 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepika padukone fumes as daily publishes story on her dress