संजय लीला भन्साळींचा भारतीय महिला बॉक्सर मेरी कोमच्या आयुष्यावरील बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘मेरी कोम’ उद्या (५ सप्टेंबर) प्रदर्शित होत आहे. चित्रपटात प्रियांका चोप्रा मेरी कोमची मुख्य व्यक्तिरेखा साकारत आहे. हा चित्रपट का पाहावा, याची पाच प्रमुख कारणे येथे देत आहोत –
१. प्रियांका चोप्रा – माजी विश्वसुंदरी प्रियांकाने चित्रपटात मेरी कोम या ऑलिम्पिक बॉक्सिंग चॅम्पियनची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी खडतर सराव केला. मेरी कोमचे व्यक्तिमत्व हुबेहुब साकारण्यासाठी अथक शारीरिक परिश्रमांबरोबर तिने मणिपुरी भाषादेखील आत्मसात केली.
२. मेरी कोम – मेरी कोम ही स्त्रियांबरोबरच अनेक खेळाडुंसाठी प्रेरणास्थान आहे. एक माता आणि गृहिणी असलेल्या मेरी कोमने अनेक अडथळ्यांवर मात करीत चिकाटीने आपला क्रीडा क्षेत्रातील प्रवास सुरू ठेवला आणि महिलादेखील क्रीडाक्षेत्रात घवघवीत यश प्राप्त करू शकतात, दे दाखवून दिले.
३. खेळाडूच्या जीवनावरील चित्रपट – शाहरूख खानचा चक दे इंडिया आणि फरहान अख्तरचा भाग मिल्खा भागसारख्या चित्रपटांनी भारतीय चित्रपटक्षेत्रात एका नव्या पर्वाला सुरुवात केली. क्रीडाभेत्रातील प्रेरणादायी अशा या चित्रपटांनी हाणामारी आणि लव्हस्टोरीसारख्या नेहमीच्या धाटणीतल्या चित्रपटांना छेद दिला.
४. संजय लीला भन्साळी – ह्या चित्रपटकर्त्याचा सिनेमाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर जादू पसरविण्यात हातखंडा आहे. जरी संजय लीला भन्साळी हे केवळ मेरी कोम चित्रपटाचे सह-निर्माता असले, तरी चित्रपटाशी त्यांचे नाव जोडले गेल्याने हा एका चांगला चित्रपट असल्याची खात्री पटते.
५. ईशान्य भारत – मेरी कोम चित्रपटाद्वारे आपल्याला इशान्य भारताची नयनरम्य सफर घडते. चित्रपटात मणिपुरी जीवनशैली आणि संस्कृती पाहायला मिळते. दुर्दैवाने, अनेक भारतीयांना देशाच्या या भागाबाबत फार कमी माहिती आहे.