तालिबान संघटनेला विरोध करून स्त्री शिक्षणाचा प्रचार करणाऱ्या मलाला युसूफझईच्या समर्थनार्थ पाकिस्तानमधील एका रॉक बॅन्डने गाणे गायले असून, कट्टरपंथीय तत्वांचे प्राबल्य असलेल्या पाकिस्तानात या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ‘लाल’ नावाच्या पाकिस्तानी रॉक बॅन्डने ही दोन गाणी तयार केली आहेत. ‘डरते है बंदुको वाली एक नीहत्ती लडकी से’ आणि ‘यु गीव्ह मी होप मलाला’ हे रॉक प्रकारातील इंग्रजी गाणे असून, या दोन्ही गाण्यांना पाकिसातानातील बहुतेक भागांतून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे या बॅन्डचे संस्थापक, लेखक, प्रवक्ता आणि प्रमुख गायक तैमुर यांनी सांगितले. लाहोर, कराची, इस्लामाबाद आणि रावळपिंडीमधून या दोन्ही गाण्यांना उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळत असला तरी वायव्य पाकिस्तानातील खैबर पखतूनखावा प्रांतातील स्वात घाटीत या गाण्यांना विरोध होतो आहे. स्त्री शिक्षणाचा प्रचार केल्याप्रकरणी याच ठिकाणी तालिबान्यांनी निर्घृणपणे मलालाच्या डोक्यात आणि मानेत गोळी मारली होती. मलालाच्या समर्थनार्थ असलेल्या या गाण्यांना अनेकजणांकडून द्वेशपूर्ण ई-मेल येत असले तरी पाकिस्तानात सर्वत्र अशी परिस्थिती नसून, पंजाब आणि सिंधमधील खेडेगावातील मुली या गाण्यात सहभागी होऊन चांगला प्रतिसाद देत असल्याचे तैमुर म्हणाले.
मलालावर तालिबान संघटनेने हल्ला केल्यानंतर तिचे कुटुंबीय इग्लंडमध्ये स्थायिक झाले. मलालाचे वडील झैउद्दीन युसूफझई यांनी इग्लंडवरून ई-मेलद्वारे या दोन गाण्यांबद्दल ‘लाल’ बॅन्डचे आभार मानल्याचे या गाण्यांचे रचनाकार तैमुर यांनी सांगितले. सामाजिक आणि प्रागतिक संदेश देणाऱ्या गाण्यांसाठी ओळखला जाणारा तैमुर यांचा ‘लाल’ हा बॅन्ड २००८ साली जन्माला आला. त्यांच्याद्वारे खास करून फैझ अहमद फैझ आणि हबीब जालीब यांच्या कविता गायल्या जातात.
या बॅन्डने बाल विवाह, बाल कामगार, लहान मुलांवर होणारा अत्याचार, स्त्री शिक्षण अधिकार, पोलिओसारख्या समस्या, दहशतवादाला विरोध, लैंगिक समानता आणि कामगारांचे अधिकार अशा विविध सामाजिक विषयांवर आपल्या गाण्यांमधून भाष्य केले आहे.
चौथ्यांदा भारत भेटीवर आलेले आणि कोलकातामधील स्त्रियांचा सामाजिक जीवनातला मोठ्या प्रमाणावरील सहभाग बघून अचंबित झालेले तैमुर म्हणाले, पाकिस्तानातसुद्धा अनेक वर्षे पुरुषांच्या प्राबल्याखाली असलेल्या क्षेत्रात आता महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आहेत. परंतु, भारताप्रमाणे पाकिस्तानी स्त्रियांना वाव आणि संधी उपलब्ध नसल्याने समाजातील त्यांचा वावर खूपच कमी असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा