मराठी चित्रपटांना दिल्या जाणाऱ्या मानाच्या पुरस्कारांमध्ये स्क्रीन पुरस्कारांचा महत्त्वाचा समावेश दरवर्षी असतो. २०१३ साली झळकलेल्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती यामध्ये अनेकांनी पदार्पण केले. एवढेच नव्हे तर चांगली कामगिरी करून दाखवली आहे. निर्माता म्हणून हिंदीच्या रूपेरी पडद्यावरील अभिनेता रितेश देशमुखने मराठी चित्रपटाच्या निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले. तर अभिनेता नितीश भारद्वाज यांनी ‘पितृऋण’ द्वारे मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शनात पदार्पण केले. त्याचबरोबर ज्येष्ठ नाटककार-लेखक रत्नाकर मतकरी यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले. ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांनी बऱ्याच कालावधीनंतर मराठी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली. २०१३ सालात मराठी चित्रपटांनीही गल्लापेटीवर यश मिळवून हिंदी चित्रपटसृष्टीचे लक्ष मराठी चित्रपटांकडे वळविले. त्याचबरोबर अनेक मराठी चित्रपटांनी विविध गटांतील राष्ट्रीय पुरस्कार पटकाविले.
यंदाच्या स्क्रीन पुरस्कारांमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी २०१३ मधील सर्वाधिक यशस्वी ‘बालक पालक’ आणि ‘दुनियादारी’ या चित्रपटांना नामांकन मिळाले आहे. या सर्वाधिक यशस्वी चित्रपटांची स्पर्धा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘संहिता’, ‘इन्व्हेस्टमेंट’, ‘अनुमती’ या चित्रपटांबरोबरच वेगळे कथानक, अप्रतिम मांडणी असलेल्या ‘पितृऋण’ या चित्रपटाशीही होणार आहे.
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाच्या स्क्रीन पुरस्कारासाठी गजेंद्र अहिरे (अनुमती), रवी जाधव (बालक पालक), संजय जाधव (दुनियादारी), नितीश भारद्वाज (पितृऋण), रत्नाकर मतकरी (इन्व्हेस्टमेंट) आणि सुनील सुकथनकर-सुमित्रा भावे (संहिता) यांना नामांकन मिळाले आहे.
सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कारासाठी यंदा सगळे दिग्गज कलावंत आहेत. ‘नारबाची वाडी’ मधील इरसाल नारबा साकारणारे ज्येष्ठ अभिनेता दिलीप प्रभावळकर, वेगळ्या स्तरावरची प्रेमकथा मांडूनही यशस्वी ठरलेल्या सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘प्रेमाची गोष्ट’मधील प्रमुख भूमिकेसाठी अभिनेता अतुल कुलकर्णी, ‘पुणे ५२’मधील प्रमुख भूमिकेसाठी गिरीश कुलकर्णी यांना नामांकन मिळाले आहे. तर ‘आजचा दिवस माझा’मधील मुख्यमंत्री व ‘पितृऋण’मधील अप्रतिम दुहेरी भूमिका अशा दोन चित्रपटांतील प्रमुख भूमिकांसाठी अभिनेता सचिन खेडेकर यांनाही नामांकन मिळाले आहे.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कारासाठी रूपेरी पडद्यावरील ज्येष्ठ, नवोदित आणि स्थिरावलेल्या अभिनेत्रींमध्ये चुरस होणार आहे. ‘पितृऋण’मधील अनोख्या भूमिकेसाठी ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांच्याशी ‘लग्न पाहावे करून’मधील भूमिकेसाठी मुक्ता बर्वे, ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’ या चित्रपटातील भूमिकेसाठी पल्लवी जोशी, ‘७२ मैल एक प्रवास’मधील भूमिकेसाठी स्मिता तांबे, ‘संहिता’मधील भूमिकेसाठी देविका दफ्तरदार, ‘टाईम प्लीज’ प्रमुख भूमिकेसाठी अभिनेत्री प्रिया बापट यांना स्पर्धा करावी लागणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा