” ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या वैशिष्ठ्यपूर्ण भूमिकेमुळे ‘नागरिक’ चित्रपटाला वेगळा भारदस्तपणा आला असून त्यांची भूमिका ही चित्रपटाच्या दृष्टीने फार महत्वाची बाब ठरणार आहे” असे या चित्रपटाचे दिग्दर्शक जयप्रद देसाई यांनी शुक्रवारी ( ८ मे ) पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले. पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या राज्य शासनाच्या चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ‘नागरिक’ चित्रपटाने तब्बल पाच पुरस्कार मिळवून बाजी मारली आहे. त्यानंतर ‘नागरिक’ च्या टीमने ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या घरी जाऊन त्यांचे शुभार्शीवाद घेतले आणि या चित्रपटाच्या प्रमोशनचा प्रारंभही केला. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिग्दर्शक जयप्रद देसाई यांनी, या चित्रपटात प्रचलित समाज व्यवस्थेमुळे सामान्य नागरिकाची कशी फरफट होत आहे त्याचे चित्रण ‘नागरिक’ मध्ये पाहायला मिळेल असे सांगितले. हा चित्रपट येत्या १२ जूनला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होईल अशी माहितीही त्यांनी दिली. याप्रसंगी निर्माते सचिन चव्हाण तसेच चित्रपटातील प्रमुख कलाकार सचिन खेडेकर आणि मिलिंद सोमण हेही उपस्थित होते. 

श्री महेश केळुस्कर यांच्या एका कथेवर सतत पाच वर्षे काम करून ‘नागरिक’ चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असे सांगून दिग्दर्शक जयप्रद देसाई म्हणाले, आपली समाजयंत्रणा इतकी असंवेदनशील बनत चालली आहे की त्यामुळे अनेक सामान्य माणसांचे बळी जात आहेत त्याचेच चित्रण ‘नागरिक’ मध्ये करण्यात आले आहे. या ‘नागरिक’ मुळेच मी उत्तम फिल्ममेकर बनलो असेही त्यांनी सांगितले. या चित्रपटात केवळ दिग्गज कलाकार नाहीत तर संवादाबरोबरच वेशभूषा, ध्वनी या चित्रपटाच्या जमेच्या बाजू ठरल्या आहेत असेही ते म्हणाले.
या चित्रपटात सचिन खेडेकर यांनी ‘श्याम जगदाळे’ या पत्रकाराची भूमिका केली आहे. त्यासंदर्भात बोलताना खेडेकर म्हणाले की, एखाद्या प्रकारांतील खरे सत्य बाहेर काढण्यासाठी पत्रकाराला अनेक गोष्टींना तोंड द्यावे लागते. समाजाला रुचेल, पचेल अशा भाषेतच खरे सत्य सांगावे लागते. आणि अनेकदा अनेक कारणांमुळे वस्तुस्थिती झाकूनच ठेवावी लागते. अशावेळी पत्रकाराच्या मनात मानसिक आंदोलने चालू असतात. अशाच एका पत्रकाराचे प्रतिनिधित्व मी माझ्या भूमिकेतून केले आहे. त्यादृष्टीने ही भूमिका करणे अतिशय अवघड आणि आव्हानात्मक होते असे सांगताना ते म्हणाले, अर्थात माझी ही भूमिका अनेक नव्या पत्रकारांना प्रेरणादायी ठरू शकते.
या चित्रपटात राजकीय नेत्याची भूमिका करणारे मिलिंद सोमण म्हणाले, या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या बरोबर काम करण्याची मला पहिल्यांदा संधी मिळाली त्यामुळे मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो. अर्थात त्यांच्याबरोबर काम करताना मला कोणत्याही स्वरूपाचे दडपण आले नाही. माझी भूमिकाही खूप वेगळी असल्याने माझ्या करिअरच्या दृष्टीने महत्वाची ठरली आहे असेही ते म्हणाले.
निर्माते सचिन चव्हाण म्हणाले, ‘नागरिक’ मुळे एका चांगल्या चित्रपटाची निर्मिती करण्याचे भाग्य मला लाभले. दिग्गज कलाकारांच्या भूमिकेबरोबरच चित्रपटाच्या इतर तांत्रिक बाजूही भक्कम करण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न केले आहेत असे त्यांनी सांगितले. ‘नागरिक’ या चित्रपटात सचिन खेडेकर, मिलिंद सोमण यांच्याखेरीज डॉ. श्रीराम लागू, दिलीप प्रभावळकर, देविका दफ्तरदार, नीना कुलकर्णी, सुलभा देशपांडे, राजेश शर्मा, माधव अभ्यंकर आदींच्या भूमिका आहेत.

Story img Loader