सलमान खानचा चित्रपट आणि ईद यांचे जुने समीकरण आहे. सलमान खानचे असंख्य चाहते या दिवसाची आतुरतेने वाट पाहात असतात. या ईदला सलमान खान ‘किक’ चित्रपट घेऊन चाहात्यांच्या भेटीला येतो आहे. चित्रपटाचे पोस्टर आणि ट्रेलर प्रसिद्ध झाले असून, चित्रपटात सलमान खानने साकारलेल्या अदभूत आणि थक्क करणाऱ्या स्टंटची झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. ट्रेलरच्या सुरुवातीला सुपरहिरोप्रमाणे चेहऱ्यावर मास्क धारण करून खलनायकांशी दोन हात करत त्यांना चकवा देणारा सलमान खान दिसतो. सुपरहिरो स्टाईल हाणामारीनंतर एन्ट्री होते ती चित्रपटातील हिरोइन जॅकलिन फर्नांडिसची, इथे जॅकलिन आणि सलमानच्या रोमान्सबरोबर नृत्य, हाणामारीची दृष्ये, विनोदी आणि खुसखशीत संवादांची अनुभूती होते. पुढच्याच क्षणी पुन्हा एकदा गाड्यांचा पाठलाग, भरधाव वेगाने मोटरसायकल चालवणे आणि उंच इमारतीवरून उडी मारण्यासारखी अंगावर रोमांच आणणारी थरारक दृष्ये पाहायला मिळतात. सलमान खानचा चित्रपट म्हटला की त्यात हाणामारी, रोमान्स, गाणी आणि विनोद असा आवश्यक फिल्मी मसाला आलाच. परंतु, यावेळी सपुरहिरोच्या मास्कद्वारे चाहत्यांच्या मनात चित्रपटाविषयी उत्कंठा वाढविण्यात सलमान खानला नक्कीच यश आल्याचे जाणवते. चित्रपटाचा ट्रेलर प्रसिद्ध होऊन काही तासच होत असताना या ट्रेलरला यूट्युबवर १५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. चित्रपटात सलमान खान, जॅकलिन फर्नांडिसबरोबर नवाझउद्दीन सिद्दीकी आणि रणदीप हूडा यांच्यासुद्धा भूमिका आहेत. चित्रपटाचे निर्माता आणि दिग्दर्शक साजिद नाडियादवाला असून, कथा चेतन भगत यांची आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा