हिंदी चित्रपटांना त्यांच्या आशयानुसार प्रमाणित करण्याची जबाबदारी असलेल्या चित्रपट परिनिरीक्षण मंडळ अर्थात सेन्सॉर बोर्डाच्या कारभारातला सावळा गोंधळ नित्यनेमाने सुरूच असून त्याचा ताजा अनुभव ‘फाइंडिंग फॅ नी’ चित्रपटाच्या निर्माते-दिग्दर्शकांना आला आहे. या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पदुक ोणच्या तोंडी ‘आय अ‍ॅम व्हर्जिन’ असे वाक्य आहे. या वाक्यावर आक्षेप घेत सेन्सॉर बोर्डाने दिग्दर्शक होमी अडजानिया यांना हे वाक्य काढून टाक ण्याची सूचना केली होती. मात्र, स्वत:च्याच कारभारातला गोंधळ लक्षात आल्यानंतर सेन्सॉरने या दृश्याला पुन्हा एकदा मान्यता दिली आहे.
‘फाइंडिंग फॅ नी’ चित्रपटातील कथानकाला संपूर्णपणे गोव्याची पाश्र्वभूमी आहे. दीपिका पदुकोण आणि अर्जुन कपूर यांची या चित्रपटात मुख्य भूमिका असून १२ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दीपिका आणि अर्जुनवर चित्रित झालेल्या एका दृश्यात दीपिकाच्या तोंडी ‘आय अ‍ॅम व्हर्जिन’ असे वाक्य आले आहे. या वाक्यावर सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांनी आक्षेप घेतला होता. ऐन आठवडय़ावर प्रदर्शन आले असताना हा कट सुचवण्यात आल्यामुळे नेहमीप्रमाणे बिग बजेट चित्रपट सेन्सॉरच्या कात्रीत सापडतात तशीच ‘फाइंडिंग फॅ नी’ची स्थिती झाल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, होमी अडजानिया यांनी चित्रपट पुन्हा एकदा बोर्डाकडे फे रपरीक्षणासाठी पाठवला. त्याचवेळी त्यांनी बोर्डाच्या अध्यक्षा लीला सॅमसन यांच्याकडे ईमेलद्वारे बोर्डाच्या कारभारातल्या विरोधाभासाकडेही लक्ष वेधले.
मुळात, या चित्रपटाचे ट्रेलर गेले दोन महिने वाहिन्यांवर आणि सोशल मीडियावर चर्चेत आहेत. या ट्रेलरमध्ये दीपिकाच्या या संवादाचा समावेश असून त्या ट्रेलरला सेन्सॉरकडून मान्यता मिळाली होती. मात्र, चित्रपटात याच संवादावर आक्षेप घेण्यात आला आहे. आम्ही लीला सॅमसन यांना हा विरोधाभास दाखवून दिला. ते दृश्य काढून टाकण्यासाठी आमची ना नाही. मात्र, ट्रेलरमध्ये तो संवाद चालला आणि चित्रपटात नाही असे का, यामागचे कारण आम्हाला स्पष्ट करा, एवढीच विनंती आम्ही त्यांना केली होती, असे होमी अडजानिया यांनी सांगितले. अखेर, जर ट्रेलरमध्ये त्या संवादाला मान्यता देण्यात आली असेल तर चित्रपटातही त्याला मान्यता दिली गेली पाहिजे, असा निर्णय देत लीला सॅमसन यांनी ‘फाइंडिंग फॅ नी’च्या प्रदर्शनातली अडचण दूर केली आहे. मात्र, यानिमित्ताने सेन्सॉर बोर्डाचा सावळा गोंधळ पुन्हा एकदा निष्पन्न झाला आहे.

Story img Loader