बॉलीवूडचा मि.परफेक्टशनिस्ट त्याच्या चाहत्यांना नेहमीच त्याचे चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी आश्चर्याचा झटका देतो. पण, यावेळी त्याने त्याच्या सर्वच सीमारेषा ओलांडत काहीतरी नवीन केलं आहे. आपल्या चित्रपटांसाठी टक्कल आणि पायांवरचे केसही काढणा-या आमिरने त्याच्या आगामी ‘पीके’ चित्रपटाकरिता खूप मोठे आव्हान पेलले आहे.
आमिरने ‘पीके’ चित्रपटाचा पहिला पोस्टर ट्विट केला  आहे. यात तो पूर्ण निर्वस्त्र अवस्थेत असून त्याच्या हातात केवळ रेडिओ दाखविण्यात आला आहे. त्याने ट्विट केले आहे की, “तुम्हाला काय वाटतयं मित्रांनो? मला लवकर सांगा…. तुमच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.” आमिरच्या आत्तापर्यंतच्या चित्रपटातील हा सर्वात बोल्ड पोस्टर आहे. राजकुमार हिराणी दिग्दर्शित या चित्रपटात आमिर, अनुष्का शर्मा आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या प्रमुख भूमिका असून हा चित्रपट १९ डिसेंबरला प्रदर्शित होईल. आमिरचा हा पोस्टर पाहता नक्कीच याबाबत चर्चेला उधाण येणार आहे.

Story img Loader