तब्बल दहा वर्षांपूर्वी याच दिवशी शांत स्वभाव असलेला आदित्य हा कशाचीही पर्वा न करता बिंधास्त जगणाऱ्या गीतच्या प्रेमात पडला होता. गीत ढिल्लोन आणि आदित्य कश्यप यांच्या प्रेमकहाणीने प्रेक्षकांना भुरळ घातली होती. ‘मौजा ही मौजा’ म्हणत या प्रेमीयुगुलाने सर्वांना थिरकण्यास भाग पाडले होते. मात्र, त्यानंतर या जोडीचे काय झालं? त्यांच्या प्रेमाचा प्रवास असाच सुरु राहिला की परस्परविरोधी व्यक्तिमत्व असणाऱ्या या जोडप्याच्या नात्यात नंतर दुरावा आला? गीत आणि आदित्यची संपूर्ण सिनेसृष्टीला ओळख करून देणाऱ्या दिग्दर्शक इम्तियाज अली याने ‘जब वी मेट’ चित्रपटाला दहा वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने यावरून पडदा उचलला आहे.
वाचा : …म्हणून अक्षयने ‘त्या’ रिक्षाचा फोटो केला शेअर
‘मौजा ही मौजा (चित्रपटाचा शेवट) नंतर गीत खूप उत्साहाने हनिमूनची तयारी करते. सुरुवातीपासूनच ‘फेरीटेल्स’मध्ये रमणाऱ्या गीतकडे पाहून आदित्यही आनंदात असतो. त्यानंतर ते काही ठिकाणी हनिमूनला जातात. पुढचं आयुष्य कसे जगावे आणि दैनंदिन गोष्टी कशा असाव्यात याबद्दल गीत नेहमीच व्यक्त होत असते. खरंतर हे बरोबर आहे. पण एक वेळ अशी येते जेव्हा या गोष्टींचे प्रमाण वाढत जाते. आयुष्यात नवनवीन बदल घडवण्याच्या नादात खऱ्या संघर्षाला आणि त्यांच्यातील वादाला सुरुवात होते, असे असूनही आदित्य कधीच तिच्याकडे तक्रार करत नाही. अखेर, गीतला स्वतःच याची जाणीव होते. आपण जसे वागतोय त्याप्रमाणे आदित्यनेही वागावे, या आपल्या अपेक्षांमुळे त्याच्यावर आपण शिरजोरी तर करत नाही ना, असा विचार तिच्या मनात येतो. यानंतर गीतच्या व्यक्तिमत्त्वामध्ये बदल होऊन ती समंजस होते. पण, असे करताना तिचा मूळ स्वभावच ती दडपून टाकतेय, याची तिला जाणीव होण्याची गरज असते.’
वाचा : ‘पद्मावती’बद्दल शर्मिला टागोर म्हणतात..
याच विचारामुळे दिग्दर्शक इम्तियाजने चित्रपटाचा पुढचा भाग आणला नाही. याविषयी तो म्हणतो की, मला अनेकदा ‘जब वी मेट’ चित्रपटाचा सिक्वल आणण्यास सांगण्यात आले. पण, गीतने तडजोड केलेली मला पटत नसल्यामुळे मी चित्रपटाचा सिक्वल न आणण्याचे ठरवले. त्या दोघांमध्ये वाद होतात आणि गीतने या परिस्थतीतून जाऊ नये, अशीच माझी इच्छा आहे. गीतमध्ये असलेली निरागसता आणि तिचा मूळ स्वभाव मला तसाच ठेवायचा आहे.
एकंदरीत इम्तियाजच्या बोलण्यावरून तो ‘जब वी मेट’चा सिक्वल काढणार नाही हे स्पष्ट होते.