बॉक्स ऑफीसवर ‘थलैवा’ रजनीकांत यांची क्रेझ कायम आहे. रजनीकांत व अक्षय कुमार यांची मुख्य भूमिका असलेला भारतातील सर्वांत महागडा चित्रपट ‘2.0’ जबरदस्त कमाई करत आहे. एकीकडे हिंदी डब व्हर्जनमधील या चित्रपटाने कमाईचा १५० कोटींचा आकडा पार केला आहे तर दुसरीकडे केवळ दहा दिवसांत जगभरात ‘2.0’ची कमाई ५०० कोटींहून अधिक झाली आहे.

देशभरातच नाही जगभरात ‘2.0’ला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. चिट्टी, डॉ. वशी आणि त्यांच्या करामतींची गोष्ट पुढे नेण्यासाठी जो भव्यदिव्यपणा आणि व्हीएफएक्स तंत्राची अचूक जोड मिळायला हवी ती सुदैवाने 2.0 मध्ये दिग्दर्शक एस. शंकर यांनी खूप चांगल्या पद्धतीने साध्य केली आहे. त्यामुळे आठ वर्षांनी आलेला हा सिक्वल तंत्राच्या बाबतीत भारी पडला आहे.

वाचा : कपिल-सुनिलला एकत्र आणण्यासाठी ‘भाईजान’चे प्रयत्न

२०१० मध्ये प्रदर्शित झालेला रोबो हा सर्वार्थाने यंत्र आणि माणूस यांच्यातल्या युद्धाची गोष्ट होती. आठ वर्षांनी चिट्टीला परत आणताना यंत्र आणि माणसाची ही गोष्ट आणखी वेगळ्या पद्धतीने पुढे येते. २.० चित्रपटाच्या निमित्तानं रजनीकांत आणि अक्षय हे दोन सुपरस्टार पहिल्यांदा एकत्र आले. भारतातील हा सर्वात मोठा बजेट असलेला चित्रपट असून त्यासाठी जवळपास ५०० कोटींहून अधिक रुपये खर्च करण्यात आले आहेत. हा चित्रपट जगभरात सुमारे १५ भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.