आगामी ‘२.०’ चा पोस्टर पाहून तुमच्या अंगावर काटा आला असेल यात अजिबात शंका नाही. आजवर आपल्याला हसवणारा आणि अॅक्शन सीन्समध्ये सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा अभिनेता अक्षय कुमार पहिल्यांदाच भीतीदायक लूकमध्ये पाहायला मिळतोय. ‘२.०’ मध्ये खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या अक्षयच्या भूमिकेचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. एकंदरीत चित्रपटाचे भव्य ऑडिओ लाँच आणि पोस्टर्स पाहता रजनीकांत, अक्षयचा हा चित्रपट सर्वार्थाने चर्चेचा विषय ठरत आहे.

वाचा : ऐश्वर्याला पाहताच प्रत्येक वेळी माझे भान हरपायचे, बॉलिवूड अभिनेत्याची कबुली

‘२.०’ हा चित्रटपसृष्टीतील केवळ सर्वाधिक महागडाच नाही तर बहुप्रतिक्षित चित्रपट असून, अक्षयचा हा लूक पाहता प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच शिगेला पोहचली असेल यात काही शंका नाही. अक्षय यात रिचर्ड या शास्त्रज्ञाच्या भूमिकेत दिसेल. बॉलिवूड आणि कॉलिवूडच्या दोन मोठ्या सुपरस्टार्सना एकत्र आणणाऱ्या या चित्रपटात अभिनेत्री अॅमी जॅक्सनचीसुद्धा भूमिका आहे.

गेल्याच आठवड्यात दुबईमध्ये झालेल्या ग्रॅण्ड ऑडिओ लाँचवेळी अक्षय म्हणालेला की, ‘रजनी सर हे खरे सुपरस्टार आहेत. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी दिल्यामुळे मी शंकर सरांचे आभार मानतो. ‘२.०’ सारख्या मोठ्या आणि महागड्या चित्रपटात काम करण्याची संधी मला मिळेल असा विचारही मी कधी केला नव्हता. मी आतापर्यंत १३० चित्रपट केले असून, ‘२.०’ हा माझ्या कारकिर्दीतील १३१ वा चित्रपट आहे. हे चित्रपट करताना मला काही ना काही शिकायला मिळाले. पण, ‘२.०’च्या संपूर्ण चित्रीकरणातच मी शिकत होतो.’

वाचा : अखेर चुलत बहिण राणीला भेटायला गेली काजोल!

‘२.०’ पुढच्या वर्षी २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. पण, यामुळे अक्षयचे चाहते आता दुविधेत पडले आहेत. कारण, त्याचा ‘पॅडमॅन’ हा चित्रपट ‘२.०’ च्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच २६ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.