‘आई माझी काळूबाई’ या मराठी मालिकेच्या सेटवरील २२ कलाकार व क्रू मेंबर्संना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे मालिकेची शूटिंग थांबवण्यात आली आहे. सेटवरील अनेकांना करोनाची लागण झाल्याने १५ सप्टेंबर रोजी मालिकेची शूटिंग थांबवण्यात आली. या मालिकेची शूटिंग साताऱ्यामध्ये होत होती. मात्र आता मुंबईतील फिल्म सिटीमध्ये शूटिंग करण्यात येणार असल्याचं समजतंय.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, सहा दिवसांच्या ब्रेकनंतर दुसऱ्या क्रू मेंबर्सच्या टीमसोबत सोमवारपासून या मालिकेच्या शूटिंगला सुरुवात झाली. ज्यांना करोना लागण झाली आहे, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सेटवर पुन्हा एकदा करोनाची चाचणी करण्यात आली. ज्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला त्यांनाच काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

अनलॉकदरम्यान मालिकांच्या शूटिंगला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर इतक्या मोठ्या संख्येवर सेटवरील लोकांना करोनाची लागण झाल्याची ही पहिलीच घटना असल्याचं म्हटलं जात आहे.

आशालता वाबगावकर यांचे निधन

‘आई माझी काळूबाई’ या मालिकेच्या चित्रीकरणासाठी ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर साताऱ्याला आल्या होत्या. त्याच ठिकाणी त्यांना करोनाची लागण झाल्याने अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. या मालिकेचं चित्रीकरण सातारा जिल्ह्यातील फलटण, लोणंद, वाई या परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू होतं. मालिकेतील एका गाण्यासाठी मुंबईहून एक डान्स ग्रुप आला होता. यातील काही जणांना करोनाची बाधा झाल्याची शक्यता असल्याने सेटवरील सुमारे २२ जणांना करोनाची लागण झाली.