सध्याच्या घडीला १०० कोटींच्या चित्रपटांचा बादशहा म्हणून सलमानला ओळखले जाते. पण, एक काळ असा होता जेव्हा चित्रपट किती कमाई करणार याकडे सलमानचे लक्ष लागून राहिले असायचे. २८ वर्षांपूर्वी ‘मैने प्यार किया’ चित्रपटामुळे सलमान प्रसिद्धी झोतात आला. या चित्रपटात भाग्यश्री, आलोक नाथ, रीमा लागू, राजीव वर्मा आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याही भूमिका होत्या. सूरज बडजात्या हे केवळ २५ वर्षांचे असताना त्यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. हा त्यांच्या कारकिर्दीतील पहिलाच चित्रपट ठरला. ‘मैने प्यार किया’ चित्रपटाने सलमानला ‘प्रेम’ ही नवी ओळख दिली. नंतर ‘राजश्री’ बॅनरच्या अनेक चित्रपटांमध्ये त्याने याच नावाने भूमिका केल्याचे पाहायला मिळाले.
‘मैने प्यार किया’ चित्रपटाला आता २८ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने या चित्रपटाविषयी आठ अशा गोष्टी जाणून घेऊयात ज्या तुम्हालाही माहित नसतील.
१. सलमान या चित्रपटासाठी ऑडिशनला गेला होता तेव्हा त्याने त्याची मैत्रीण आणि कोरिओग्राफर फराह खानला त्याच्यासोबत येण्यास सांगितले होते. त्यावेळी त्याच्या मनात भीती होती की, सूरज बडजात्या त्याला डान्स करायला सांगितील आणि यात त्याला अपयशी व्हायचे नव्हते.
२. त्यावेळी सलमानला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पण विभागातील पुरस्कार मिळाला होता. मात्र, हा त्याचा पहिला चित्रपट नव्हता. त्याआधी त्याने ‘बिवी हो तो ऐसी’मध्ये सहायक अभिनेत्याची भूमिका साकारली होती.
३. चित्रपटात सलमानच्या आईची भूमिका साकारणाऱ्या रीमा लागू त्याच्यापेक्षा केवळ सात वर्षांनी मोठ्या होत्या. काही महिन्यांपूर्वीच रीमा यांचे निधन झाले.
वाचा : ‘टायगर जिंदा है’ ठरला यंदाच्या वर्षी सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट
४. ‘मेरे रंग मै रंगनेवाली’ हे गाणं खरंतर युरोपच्या ‘द फायनल काउन्टडाऊन’ या अल्बममधून कॉपी करण्यात आले होते.
५. चित्रपटासाठी सलमानला सुरुवातीला ३१ हजार रुपये मानधन देण्यात आले होते. नंतर त्यात वाढ करून त्याला ७५ हजार रुपये देण्यात आल्याचा खुलासा स्वतः सलमाननेच एका मुलाखतीत केला होता.
६. विनोदवीर राजू श्रीवास्तव आणि सध्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत जेठालालची भूमिका साकारणारा अभिनेता दिलीप जोशी हे दोघंही या चित्रपटाचा भाग होते.
वाचा : ‘जो जिता वही सिकंदर’च्यावेळी जखमी झाली होती आएशा
७. ‘कबूतर जा जा’ गाण्यातील कबूतराचे नाव ‘हॅण्डसम’ असे होते.
८. त्यावेळी ‘मैने प्यार किया’ने फिल्मफेअरचे सर्वाधिक पुरस्कार पटकावले होते. या चित्रपटाला फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यामध्ये १३ विभागांमध्ये नामांकन मिळाले होते त्यापैकी चित्रपटाने सात पुरस्कार मिळवले होते.