‘सरस्वतीचंद्र’ मालिकेने प्रसिद्धीस आलेला अभिनेता गौतम रोडे Gautam Rode लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. ‘क्या कसूर है आमला का’ मालिकेची अभिनेत्री पंखुरी अवस्थी Pankhuri Awasthy हिच्यासोबत तो लग्न करणार असल्याचे म्हटले जातेय. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टेलिव्हिजनवरील हा प्रसिद्ध अभिनेता त्याच्या ‘सुर्यपुत्र कर्ण’ मालिकेमधील सहअभिनेत्रीला गेल्या काही काळापासून डेट करत आहे.
वाचा : करिना नव्हे तर या अभिनेत्रींनीही केलंय गरोदरपणात काम
‘सुर्यपुत्र कर्ण’ मालिकेच्या सेटवर गौतमची पंखुरीशी ओळख झाली. पौराणिक कथेवर आधारित या मालिकेत गौतमने कर्णची तर पंखुरीने द्रौपदीची भूमिका साकारली होती. ‘स्पॉटबॉय ई’ या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, या ४० वर्षीय अभिनेत्याने नुकतीच विशीत पदार्पण केलेल्या या अभिनेत्रीला लग्नाची मागणी घातली आहे. हे दोघेही त्यांच्या प्रेमसंबंधांबद्दल कधीच उघडपणे बोलले नाहीत. काही दिवसांपूर्वीच पंखुरीने गौतमच्या आईची भेट घेऊन त्यांचा आशिर्वाद घेतला. तसेच, ती आता नवीन घरात राहायला गेली आहे. तिचे हे नवे घर चारकोप येथे असून ते गौतमच्या अगदी घराजवळच आहे. पंखुरीला याबद्दल विचारले असता ती म्हणाली की, याबद्दल बोलण्याची ही योग्य वेळ नाही. याविषयी बोलण्यासारखे काही असेल तेव्हा नक्कीच मी तुम्हाला सांगेन. पण सध्या तसं काही नाही आणि याव्यतिरीक्त मी अजून काहीच बोलू शकत नाही.
वाचा : १६ वर्षीय अभिनेत्रीवर भाळले होते राजेश खन्ना; डिंपल यांच्याबद्दल सात रंजक गोष्टी
गौतमचे त्याच्या सहअभिनेत्रीसोबत नाव जोडलं जाण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी ‘सरस्वतीचंद्र’ मालिकेतील त्याची सहअभिनेत्री जेनिफर विंगेट आणि ‘महाकुंभ’मधील सहअभिनेत्री श्रद्धा आर्या यांच्यासोबतही त्याचे नाव जोडले गेले होते. सध्या गौतम रोडे त्याच्या आगामी ‘अक्सर २’ या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण करत आहे.