काही वेळापूर्वीच संजय लीला भन्साळी यांचा बहुप्रतिक्षीत ‘पद्मावती’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. हा ट्रेलर पाहून दीपिका पदुकोण, शाहिद कपूर आणि रणवीर सिंग यांनी किती मेहनत घेतली असेल याचा पुरेपुर अंदाज येतो. २०१७ मधील बहुप्रतिक्षीत सिनेमा म्हणून या सिनेमाकडे पाहिले जाते. या संपूर्ण सिनेमात सर्वात जास्त भाव खाऊन जातो तो रणवीर सिंग. तीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये त्याच्या तोंडी एकही संवाद नाही. पण त्याचा दमदार अभिनयच हा ट्रेलर अनेकदा पाहायला भाग पाडतो.

रणवीरचा या सिनेमातील लूक फारच क्रूर दाखवण्यात आला आहे. त्याच्याकडे पाहिले तरी कोणीही घाबरेल असाच काहीसा त्याचा पेहराव आणि लूक या सिनेमात आहे. रणवीरचा असा लूक त्याच्या आधीच्या कोणत्याच सिनेमात पाहिला गेलेला नाही. त्यामुळेच सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर लगेच रणवीर सिंग सोशल मीडियावर ट्रेण्ड करत होता.

सिनेमाची कथा महाराणी पद्मावतीच्या आयुष्यावर आधारित आहे. दीपिका पदुकोण यात राणी पद्मावतीची भूमिका साकारताना दिसते. ती एकंदरीत राणीच्या पेहरावात अतिशय सुंदर दिसते. तर पद्मावतीच्या नवऱ्याची अर्थात राजा रतन सिंगची भूमिका साकारणारा शाहिदही कोणत्याही राजपूत राजापेक्षा कमी दिसत नाही. १ डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता पाहायला मिळत आहे.

रणवीर या सिनेमात खलनायकाची भूमिका साकारताना दिसेल. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये रणवीर पूर्णपणे अल्लाउद्दीन खिल्जीच्या भूमिकेत शिरलेला दिसतो. या व्यक्तिरेखेमध्ये रणवीर कुठेच दिसत नाही हेच रणवीरचे खरे यश आहे.

अल्लाउद्दीन खिल्जी आणि पद्मावती यांच्यातील प्रसंग सुफी कवी मल्लिक मोहम्मद जायसी यांनी शेर शाह सुरू यांच्या काळात साधारणपणे १५४० मध्ये लिहीला होता. पद्मावतीच्या कथानकानुसार अल्लाउद्दीनला राणी पद्मावतीला जिंकायचे असते त्यासाठी तो त्यांच्या चित्तोगढ राज्यावर स्वारी करतो.

Story img Loader