बहुचर्चित बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले अवघ्या काही तासांवर आहे. गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या या शोमध्ये बरेच वादविवाद, ट्विस्ट आणि मैत्रीच्या नव्या संकल्पना पाहायला मिळाल्या. आता ग्रँड फिनालेची उत्सुकता शिगेला पोहोचली असून त्यात काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

१. स्पर्धकांचे अफलातून डान्स परफॉर्मन्स- अंतिम फेरीत पोहोचलेल्या स्पर्धकांचे धमाकेदार डान्स परफॉर्मन्स फिनालेमध्ये पाहायला मिळणार आहेत. यामध्ये मेघा आणि शर्मिष्ठा पिंगा या गाण्यावर ठेका धरणार आहेत तर सई आणि पुष्कर चांद तू नभातला या गाण्यावर रोमॅण्टिक डान्स करणार आहेत. स्मिता आणि आस्ताद आली ठुमकत नार लचकत या गाण्यावर मराठमोळं नृत्य सादर करणार आहेत.

२. अंतिम फेरीतल्या स्पर्धकांचा एकत्र परफॉर्मन्स- प्रेक्षकांना अंतिम फेरीत पोहोचलेल्या सर्व स्पर्धकांचा ग्रुप डान्सदेखील पाहायला मिळणार आहे. आस्ताद, सई, मेघा, पुष्कर, शर्मिष्ठा आणि स्मिता असे सर्वजण मिळून ‘आज की रात’ या गाण्यावर परफॉर्म करणार आहेत.

३. धक्कादायक एलिमिनेशन- बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेमध्ये बऱ्याच आश्चर्यकारक गोष्टी घडणार असून त्यापैकी एक म्हणजे धक्कादायक एलिमिनेशन होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शर्मिष्ठा राऊत शो मधून बाहेर पडणार असून फक्त पाच स्पर्धकांमध्ये विजेतेपदासाठी अंतिम लढत होणार आहे.

४. परफेक्ट मनोरंजन- ‘खल्लास’ आणि ‘नागिन नागिन’ या गाण्यांवर रेशम टिपणीस डान्स सादर करणार असून आपल्या अदांनी ती पुन्हा एकदा प्रेक्षकांना घायाळ करणार हे नक्की. तर जुई आणि ऋतुजा ‘आली रे’ आणि ‘धाकड’ गाण्यावर परफॉर्म करणार आहेत. याशिवाय इतर काही स्पर्धकांचेही अफलातून परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहेत.

५. विजेतेपदाच्या घोषणेची उत्सुकता- जवळपास १०० दिवसांच्या प्रवासानंतर अखेर बिग बॉस मराठीचा पहिला विजेता कोण असणार हे कळणार आहे. त्यामुळे या ग्रँड फिनालेकडे अनेकांचं लक्ष लागून राहिलं आहे.

Story img Loader