२०११ मध्ये ‘डॉन २’ चित्रपटात जेव्हा सुपरस्टार शाहरुख खान ‘खैके पान बनारसवाला’ या गाण्यावर थिरकला होता. त्यावेळी त्याला या गोष्टीची कल्पनाही नसेल की, सात वर्षांनंतर बनारसी पानाला त्याचे नाव देण्यात येईल. वाराणसीमधील एका पान विक्रेत्याने ‘शाहरुख खान’ असं पानाचं नाव ठेवलंय. शाहरुख सध्या त्याच्या आगामी ‘जब हॅरी मेट सेजल’ चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करतोय. प्रमोशनसाठी शाहरुख आणि अनुष्का वेगवेगळ्या शहरातही जात आहेत. दिग्दर्शक इम्तियाज अलीसोबत हे दोघे वाराणसीला प्रमोशनसाठी गेले होते.

ज्या गोष्टीसाठी वाराणसी प्रसिद्ध आहे ते म्हणजे बनारसी पान. म्हणतात ना, ‘बनारस गए और पान नही खाए, ऐसा कैसे हो सकता है.’ हीच ओळ कॅप्शनमध्ये लिहित अनुष्का शर्माने पान खातानाचा फोटोसुद्धा इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. किंग खान आणि अनुष्काने वाराणसीमधील ‘तंबूलम पान शॉप’मधून पान खाल्लं होतं. त्यानंतर दुकानाचे मालक सतीश कुमार यांना दररोज अनेकजण विचारु लागले होते की, शाहरुखने कोणता पान खाल्लेलं? त्यामुळे शाहरुखनने खाल्लेल्या मीठा पानला ‘शाहरुख खान पान’ असंच नाव देण्याचा त्यांनी निर्णय घेतला. आता ‘तंबूलम पान शॉप’मध्ये शाहरुखच्या नावाचं पान ३५ रुपयांना मिळतंय.

शाहरुख आणि अनुष्का या आपल्या आवडत्या कलाकारांना पाहण्यासाठी वाराणसीमध्ये जबरदस्त गर्दी उसळली होती. लोकांचे मनोरंजन करण्यासाठी तिथे अभिनेता मनोज तिवारीही उपस्थित होता. यावेळी शाहरुखनं अनुष्कासाठी खास भोजपुरी गाणंसुद्धा गायलं.