ऑनलाइन आणि स्मार्टफोनच्या दुनियेमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून काही दुष्कृत्यांनासुद्धा बरीच चालना मिळाली आहे. सध्या त्याचेच एक उदाहरण समोर आले आहे. इटलीतील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका ब्रिटीश मॉडेलची सेक्स स्लेव्ह म्हणून विक्री करण्यासाठी तिचे अपहरण करण्यात आले होते. गेल्या वर्षी अपहरण केलेल्या त्या मॉडेलला ड्रग्स देण्यात आले असून, तिला मारहाणही करण्यात आली होती. इतकंच नव्हे तर अतिशय निर्दयीपणे तिला एका सुटकेसमध्येही भरण्यात आले होतं.

३० वर्षीय ल्यूकाज पॅवेल हर्बा Lukasz Pawel Herba याच्यावरील आरोपांची बुधवारी सुनावणी करतेवेळी हा प्रकार उघड झाल्याचे वृत्त इटालियन वृत्तसंस्था ‘एएनएसए’ने प्रसिद्ध केले. त्याच्यावर क्लो एलिंग Chloe Ayling या मॉडेलच्या अपहरणाचा आरोप करण्यात आला होता.

‘वॉशिंग्टन पोस्ट’मध्ये प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार गेल्या वर्षी अपहरणकर्त्यांनी ‘डार्क वेब’वर तिची ऑनलाइन विक्री करण्याचा बेत आखला होता. या ठिकाणी चुकीच्या मार्गाने वस्तूंची विक्री केली जाते तसेच वस्तू विकत घेण्याऱ्याची ओळख लपवण्यात येते. अपहरणकर्त्यांनी २० वर्षीय एलिंगला ३,००,००० यूएस डॉलर्स इतक्या किमतीला विकण्याचा निर्णय घेतला होता, असं इटालियन पोलिसांच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

एलिंगने तिच्यासोबत झालेल्या त्या सर्व प्रकाराविषयी संपूर्ण माहिती दिली होती, ज्यानंतर या संपूर्ण प्रसंगाविषयी इटालियन वर्तमानपत्रातही छापून आले होते. काळ्या रंगाचे हातमोजे घातलेला एक माणूस माझ्या मागून आला. त्याचा एक हात माझ्या मानेवर होता आणि दुसऱ्या हाताने त्याने माझे तोंड दाबले होते. तर दुसऱ्या एका माणसाने माझ्या उजव्या दंडावर कसलंतरी इंजेक्शन मारलं आणि त्यानंतर हळूहळू माझी शुद्ध हरपली. जेव्हा मला जाग आली होती, तेव्हा मी गुलाबी रंगाचा बॉडीसुट आणि पायात मोजे घातले होते. मला लक्षात आले की, मी कोणत्यातरी बंद ठिकाणी होते. माझे हात, पाय बांधले होते, माझे तोंडही बंद करण्यात आले होते. मी त्यावेळी एका बॅगमध्ये बंद होते. फक्त एका लहानशा छिद्रामुळे मला श्वास घेता येणं शक्य होतं.’

वाचा : पुरुष कलाकारांनी कमी मानधन आकारावं- दीपिका पदुकोण

स्वत:चा जीव वाचवण्यासाठी एलिंगने खूप प्रयत्न केले, ती जिवाच्या आकांताने किंचाळत होती. पण, त्याचा काही फायदा झाला नव्हता. पण, ज्यावेळी अपहरणकर्त्यांना ती दोन वर्षांच्या मुलाची आई आहे, हे कळले तेव्हा मात्र त्यांनी तिला मुक्त केले, असं वृत्त काही माध्यमांनी प्रसिद्ध केले.