यश राज फिल्म्स निर्मित आणि विजय कृष्ण आचार्य दिगदर्शित ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला येत्या १ जूनपासून सुरुवात होण्याची शक्यता आहे. या चित्रपटात बॉलिवूडचे ‘शहेनशहा’ अमिताभ बच्चन, ‘मि. परफेक्शनिस्ट’ आमिर खान, कतरिना कैफ आणि ‘दंगल गर्ल’ फातिमा सना शेख यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. अमिताभ आणि आमिर हे दोघेजण पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार असून, त्यांच्या चाहत्यांसाठी ही एक आनंदाची पर्वणीच असणार आहे. या चित्रपटासाठी निर्मात्यांनी सुरुवातीला बिग बींची निवड केली. त्यानंतर आमिर आणि सगळ्यात शेवटी नंतर कतरिनाची निवड करण्यात आली. कतरिनाची निवड सर्वांसाठी धक्कादायक होती. कारण, आमिर एकाच मुख्य अभिनेत्रीसोबत दुसऱ्यांदा काम करत नाही. या दोघांनीही आधी ‘धूम ३’ हा ब्लॉकबस्टर चित्रपट दिलेला आहे.
‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ची कथा वाचत असतानाचा अमिताभ आणि आमिर यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अमिताभ बच्चन यांच्या फॅनपेजवरून हा फोटो ट्विट करण्यात आला असून, त्यावर लिहिलंय की, ‘ठग्स ऑफ हिंदोस्तानची स्क्रिप्ट वाचताना अमिताभ आणि आमिर….. १ जूनपासून चित्रीकरण सुरु होणार….. दिवाळी २०१८’
.@aamir_khan and @SrBachchan engrossed in script reading session for #thugsofhindostan …This one's already a Hit even b4 starting!! pic.twitter.com/pT8pyHnoX5
— Faridoon Shahryar (@iFaridoon) May 17, 2017
या फोटोत चित्रपटाचे दिग्दर्शक विजय कृष्ण आचार्य यांचीदेखील झलक पाहावयास मिळते. हा तगडी स्टारकास्ट असलेला चित्रपट पुढच्या वर्षी दिवाळीत प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. ‘दंगल’च्या यशानंतर आमिर आणखी एक हिट चित्रपट देण्यासाठी सज्ज होत आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.
दरम्यान, आमिर आणि फातिमा सना शेखच्या ‘दंगल’ चित्रपटाने चायनामधील बॉक्स ऑफिस रेकॉर्ड मोडला आहे. या चित्रपटाने जगभरात १००० कोटी रुपयांच्यावर कमाई केली आहे.