आमिर खान आणि जुही चावला ही बॉलिवूडमधली त्याकाळची सुपरहिट जोडी. ‘कयामत से कयामत तक’, ‘हम हे राही प्यार के’, ‘लव्ह लव्ह लव्ह’, ‘इश्क’ यांसारख्या चित्रपटातून दोघांनी एकत्र काम केलं. मात्र रुपेरी पडद्यावरची ही हिट जोडी तब्बल सात वर्षे एकमेकांसोबत अबोला धरून होती. विशेष म्हणजे आमिरने केलेल्या एका चुकीमुळे जुही त्याच्यावर प्रचंड संतापली होती. इतकंच नाही तर आमिरवर नाराज असलेल्या जुहीने ‘राजा हिंदुस्थानी’सारखा सुपरहिट चित्रपट करण्यासही नकार दिला.

१९९७ साली प्रदर्शित झालेल्या ‘इश्क’ या चित्रपटाच्या सेटवर जुही आणि आमिर यांचं किरकोळ वादातून भांडण झालं आणि त्यातून पुढे अनेक वर्ष त्यांनी एकमेकांशी बोलणं टाळलं. चित्रपटाचं चित्रीकरण सुरु असताना फावल्या वेळामध्ये आमिर, जुही, अजय आणि काजोल हे गप्पा-गोष्टी किंवा मजामस्ती करत असे. त्याचवेळी आमिरने त्याला हातावरुन भविष्य सांगता येतं असं सांगितलं. त्यामुळे प्रत्येकाने आमिरला आपला हात दाखवत भविष्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला. इतरांप्रमाणेच जुहीनेही आमिरला भविष्य सांगण्यास सांगितलं. मात्र यावेळी आमिरने जुहीची मस्करी केली. ही मस्करी जुहीला सहन झाली नाही. त्यावेळेपासून जुहीने आमिरसोबत बोलणं बंद केलं.

‘इश्क’नंतर जुहीला ‘राजा हिंदुस्थानी’ या चित्रपटाची ऑफर आली होती. या चित्रपटामध्ये आमिर खान मुख्य भूमिकेमध्ये होता. त्यामुळेच जुहीने हा चित्रपट करण्यास नकार दिला. जुहीने चित्रपट नाकारल्यानंतर या चित्रपटासाठी अभिनेत्री करिश्मा कपूरची निवड करण्यात आली.

दरम्यान, त्याकाळी आमिर – जुहीची जोडी चाहत्यांमध्ये कमालीची लोकप्रिय होती. मात्र आमिरच्या एका चुकीमुळे जुहीने अबोला धरला.मात्र बऱ्याच वर्षांच्या अबोल्यानंतर जुहीने एक दिवस स्वता:हून आमिरला फोन केला. ज्यावेळी आमिर आणि त्याच्या पहिल्या पत्नीचा घटस्फोट झाला त्यावेळी जुहीने तिचा इगो बाजूला ठेवत आमिरला फोन केला होता. सध्या या दोघांचं फारसं बोलणं होत नसलं तरीदेखील त्यांची मैत्री कायम असल्याचं आमिरने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

Story img Loader