बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानला स्वाईन फ्लूची लागण झाल्यामुळे तो पुण्यात झालेल्या पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमास उपस्थित राहू शकला नव्हता. आपण जाऊ शकत नाही याचा आमिरला अंदाज आल्यानंतर त्याने चक्क बॉलिवूडच्या बादशहाला म्हणजे शाहरुख खानलाच फोन लावला. शाहरुखला त्याने या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती केली. आता मित्राची हाक शाहरुख ऐकणार नाही असं तर होणार नाही ना… शाहरुखने त्याचक्षणी होकार देत तो पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमाला गेला. सुपरस्टार कोणत्याही कार्यक्रमाला गेले की ते तिथे काही मिनिटं थांबतात आणि निघून जातात. पण हा कार्यक्रम त्याला अपवाद ठरलात. शाहरुख एक दोन नाही तर तब्बल पाच तास थांबला. मित्राला दिलेला शब्द पाळणं काय असतं याचं उत्तम उदाहरण शाहरुखने दाखवून दिलं. त्यामुळेच त्याने फक्त आमिरचं मन जिंकलं असं नाही तर तिथे उपस्थितांचीही मनं जिंकली.

अभिनेता आमिर खान आणि किरण राव या दोघांनाही स्वाईन फ्लूची लागण

पाणी फाऊंडेशन आणि सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०१७ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विविध गावामध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेचं बक्षिस वितरण सोहळ्यावेळी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, रिलायन्स उद्योग समूहाच्या नीता अंबानी, अभिनेता शाहरुख खान, सत्यजीत भटकळ आणि कलाकार उपस्थित होते. वॉटर कपचा सर्वेसर्वा अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव हे दोघे कार्यक्रमास येणार होते. मात्र मागील दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती ठिक नसल्याने त्यांना पुण्यातील कार्यक्रमाला जाता आले नाही.

‘मी कलकत्यावरुन परतत असताना मला आमिरचा फोन आला. तब्येत ठिक नसल्यामुळे तो पुण्याला जाऊ शकत नव्हता. त्याने मला पुण्याला जाशील का असे विचारले आणि मी त्याला नाही बोलू शकलो नाही, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेहमीच दुष्काळ दूर करण्यासाठी झटत असतात हे मी त्यांच्यासोबत असताना अनुभवलं आहे. तसेच मी इथून अनेक गोष्टी शिकून जात असल्याचे त्याने सांगितले,’ असे शाहरुख यावेळी म्हणाला.

मराठी बोलता येतं की नाही असा प्रश्न त्याला विचारला असता, ‘मला मराठीमध्ये फक्त पुढे गतीरोधक आहे एवढंच येतं,’ असं शाहरुख म्हणाला. तसेच या स्पर्धेत राज्यातील अनेक जाती धर्मातील लोक एकत्र येऊन पाणी प्रश्न सोडवला असून जग काही म्हणो आपल्या देशात एकता असल्याचा या स्पर्धेतून दिसून आल्याची भावना त्याने व्यक्त केली.