‘रंगीला’ हा बॉलिवूडमधील आजवरच्या सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांपैकी आहे. या चित्रपटाने उर्मिला मातोंडकर, जॅकी श्रॉफ, ए. आर. रेहमान, रिमा लागू, यांसारख्या अनेक कलाकारांना खऱ्या अर्थाने सुपरस्टार केलं. मात्र या चित्रपटाला मिळालेल्या यशात अभिनेता आमिर खानचा सिंहाचा वाटा आहे. मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर या चित्रपटाच्या बाबतीत इतका सीरिअस होता की त्यावेळी तो एक-एक आठवडा अंघोळ देखील करायचा नाही.

अवश्य पाहा – “मोदीजी तुम्ही हे काय केल?”; करण जोहरचे आभार मानल्यामुळे कंगना होतेय ट्रोल

१९९५ साली प्रदर्शित झालेल्या ‘रंगीला’ या सुपरहिट चित्रपटाला तब्बल २५ वर्ष पूर्ण झाली आहेत. ‘रंगीला’च्या निमित्ताने एका रेडिओ वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आमिरने चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळचे काही गंमतीशीर किस्से सांगितले. तो म्हणाला, “मी रंगीलामध्ये मुन्ना नावाच्या एका टपोरी तरुणाची भूमिका साकारली होती. हा व्यक्ती चित्रपटांच्या तिकिटांचा काळा बाजार करतो. एका मवालीगिरी करणाऱ्या तरुणाच्या भूमिकेत पूर्णपणे गुंतून जाण्यासाठी त्याच्यासारखं वागण्याचा निर्णय मी घेतला. कारण त्या व्यक्तिरेखेचा फिल मला येत नव्हता. त्यानंतर मी माझ्या वैयक्तिक आयुष्यातही त्याच्यासारखा बोलायचो. अगदी आठ-आठ दिवस अंघोळी देखील केली. त्यानंतर मला ती व्यक्तिरेखा सापडली.” असा थक्क करणारा अनुभव आमिर खानने सांगितला.

अवश्य पाहा – आयला हे काय?… अमिताभ यांनी KBC च्या सेटवर वापरलेलं गॅजेट पाहून नेटकरी गोंधळले

‘रंगीला’ या चित्रपटाचं दिग्दर्शन राम गोपाल वर्मा यांनी केलं आहे. आजवर त्यांनी ‘शिवा’, ‘सत्या’, ‘कंपनी’, ‘सरकार’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रटांची निर्मिती केली आहे. परंतु ‘रंगीला’ हा त्यांचा मास्टरपिस चित्रपट होता असं म्हटलं जातं. केवळ तीन कोटी रुपयांमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने त्यावेळी तब्बल ४४ कोटी रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटाची गाणी देखील त्यावेळी सुपरहिट ठरली होती.