ज्यांच्या नावावर तिकीटबारीवर हाऊसफुलचे बोर्ड लागत होते, ज्या नावाने मराठी रसिकांना अक्षरश: वेड लावले होते, ज्यांच्या प्रवेशानेच टाळ्यांच्या कडकडाटात नाट्यगृहे दणाणून जात होती असे मराठी रंगभूमीचे पहिले सुपरस्टार नटश्रेष्ठ डॉ. काशिनाथ घाणेकर रुपेरी पडद्यावरून आपल्या भेटीला येणार आहेत. ‘आणि.. काशिनाथ घाणेकर’ हा चित्रपट येत्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. यामध्ये सुबोध भावे काशिनाथ घाणेकर यांची भूमिका साकारणार असून चित्रपटातील एक लूक त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

आरशात पाहतानाचा चेहरा सुबोधने पोस्ट केला आहे. ‘प्रेक्षकांच्या शिट्ट्या आणि टाळ्यांमध्ये जगणाऱ्या रंगभूमीच्या सम्राटाचे आयुष्य येत्या दिवाळीत आता मोठया पडद्यावर उलगडणार. २०१८ च्या आरशात रंगभूमीच्या सुवर्णकाळाचा मागोवा,’ असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे.

https://www.instagram.com/p/Bm-LnSWBPoP/

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीमध्ये डॉ. काशिनाथ घाणेकर यांचे अतुलनीय योगदान आहे. रायगडाला जेव्हा जाग येते, इथे ओशाळला मृत्यू, अश्रूंची झाली फुले, गारंबीचा बापू, आनंदी गोपाळ, शितू, तुझे आहे तुजपाशी, सुंदर मी होणार, मधुमंजिरी या आणि अशा अनेक नाटकांमधील त्यांच्या भूमिका जबरदस्त गाजल्या.

वाचा : वडिलांसोबतच्या चित्रपटातून साराने घेतला काढता पाय

चित्रपटात सुबोध भावेसोबत सोनाली कुलकर्णी आणि सुमित राघवन यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ७ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजीत देशपांडे यांनी केले आहे. १९६० च्या दशकावर आधारीत असलेल्या ‘आणि काशिनाथ घाणेकर’मध्ये या अभिनेत्याचा उदय आणि अस्त दाखविण्यात येणार आहे.