बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सर्वांनाच धक्का बसला. त्याने वयाच्या ३४व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. बॉलिवूडमधील कलाकारांनी त्याला सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली. दरम्यान बॉलिवूडमधील नेपाटीझम हा वाद पेटून उठला. तसेत अनेक कलाकारांनी बॉलिवूडमधील अनुभव शेअर करत संताप व्यक्त केला होता. आता अभिनेता अभय देओलने देखील त्याचा राग व्यक्त केला आहे. त्याने जिंदगी ना मिलेगी दोबारा या चित्रपटाच्या वेळी घडलेल्या गोष्टी सांगितल्या आहे.
अभयने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत राग व्यक्त केला आहे. पोस्टमध्ये त्याने जिंदगी ना मिलेगी दोबारा चित्रपटातील एक सीनचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये हृतिक रोशन, फरहान अख्तर आणि अभय देओल उभे असल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करत त्याने ‘२०११मध्ये जिंदगी ना मिलेगी दोबारा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आजकाल दररोज या टायटलचा जप करणे गरजेचे आहे. तुम्ही कठीण काळातही हा चित्रपट पाहू शकता’ असे म्हटले आहे.
‘त्यावेळी प्रत्येक पुरस्कार सोहळ्यात मला आणि फरहानला मुख्य अभिनेत्याच्या नॉमिनेशनमध्ये वगळण्यात आले आणि आम्हाला फक्त सहाय्यक अभिनेता म्हणून नॉमिनेट करण्यात आले. तर हृतिक आणि कतरिनाला मुख्य भूमिकेसाठी नॉमिनेट करण्यात आले. त्यानंतर मी पुरस्कारावर बहिष्कार टाकला पण जे काही सुरु होते त्याचा फरहानला फरक पडला नाही’ असे त्याने पुढे म्हटले आहे.
जिंदगी ना मिलेगी दोबारा हा चित्रपट २०११मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपट अभिनेता हृतिक रोशन, फरहान अख्तर, अभय देओल, कतरिना कैफ, कल्की कोचलीन हे कलाकार झळकले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. तसेच हा चित्रपट आजही प्रेक्षक तितक्याच आवडीने पाहतात.