रूपेरी पडद्यावर आपल्या अभिनय कौशल्याने सर्वांची मने जिंकून घेणारा अभिनेता म्हणजे अभिनय बेर्डे. अभिनयच्या ‘मन कस्तुरी रे’ या आगामी सिनेमाचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे. त्याने सोशल मिडीयाद्वारे याबाबत माहिती दिली. या सिनेमाचे दिग्दर्शक आणि लेखक संकेत माने हे आहेत. तर सुमित गिरी यांनी या सिनेमाचे संवाद लिहीले आहेत. प्रेमाची एक अनोखी कहाणी मांडणाऱ्या या सिनेमाचे चित्रीकरण संपूर्णपणे मुंबईत झाले आहे. सध्या या सिनेमातील कलाकारांची नावे गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.
चित्रीकरण पूर्ण झाल्याच्या बातमीला दूजोरा देताना सिनेमाचे लेखक-दिग्दर्शक संकेत माने म्हणाले, “कोरोना काळात अतिशय सावधानता बाळगून ‘मन कस्तुरी रे’ या सिनेमाचे चित्रीकरण सुरू झाले होते. दिग्दर्शक म्हणून माझा हा पहिलाच सिनेमा आहे. तसेच अभिनय बेर्डे हा गुणी अभिनेता आहे. त्याच्यासोबत काम करतानाचा अनुभव अप्रतिम होता. या सिनेमाचे संपूर्ण चित्रीकरण मुंबईमधील लालबाग, भांडूप, ठाणे, मिरारोड या लाईव्ह लोकेशनवर करण्यात आले. नामवंत कलाकार, तंत्रज्ञ आणि निर्माते वेंकट आर. अट्टीली आणि मृत्यूंजय किचंबरे यांच्या सोबतचे अनुभव अविस्मरणीय होते. आता आम्ही हा सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहचवायला उत्सुक आहोत.”
आणखी वाचा: लक्ष्मीकांत बेर्डेंचा मुलगा करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण? दिसणार प्रभाससोबत ‘या’ चित्रपटात?
View this post on Instagram
अभिनेता अभिनय बेर्डे चित्रीकरणाच्या अनुभवाबद्दल सांगतो, “लेखक-दिग्दर्शक संकेत माने यांच्या सोबत काम करताना खूप काही शिकायला मिळालं. स्वतःच्या अभिनयावर अभ्यास करता आला. तसेच सिनेमाची गाणी चित्रीत करताना मी खूप एन्जॉस केलं. मुंबईतल्या लाईव्ह लोकेशनवर चित्रीकरण करतानाचा अनुभव अविश्वसनीय होता.”